⚡मालवण ता.१८-: मालवण भरड येथील सती देवी घुमटीची भरड सन्मित्र रिक्ष चालक मालक संघ व भरड मित्रमंडळ यांच्यावतीने पुनर्बांधणी करताना जीर्णोद्धार करून मंदिराची उभारणी करण्यात आली असून त्याचा मूर्ती पुन: प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा आज उत्साहात व भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा झाला. यावेळी भाविकांनी उपस्थिती दर्शवत दर्शनाचा व तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला.
मालवण भरड भागात प्राचीन काळापासून सतीची विविध स्थाने असून यापैकी भरड नाका येथे असलेल्या प्राचीन अशा सती घुमटीच्या ठिकाणी भरड सन्मित्र रिक्षा चालक मालक संघ व भरड मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी दिपावली पाडव्यानिमित्त सत्यनारायण महापूजा आयोजित केली जाते. अतिशय जागृत असे हे सतीचे स्थान ओळखले जाते या सती घुमटीची पुनर्बांधणी करून आकर्षक मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे. आज या मंदिराचा कलशारोहन व मूर्ती पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. यावेळी विविध धार्मिक विधी व सतीची पूजाअर्चा पार पडली व कलशाचे आरोहण करण्यात आले. पुरोहित भूषण काजरेकर, संकेत भाटे, श्री. चिंचळकर यांच्या पौरोहित्याखाली हे धार्मिक विधी पार पडले. तर सायंकाळी सुस्वर भजनाचा कार्यक्रम पार पडला. यानिमित्त दिवसभर भाविकांनी उपस्थिती दर्शवत दर्शनाचा व तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला.
