…तर शिवसेनेने खास.राऊत यांच्या घरावर मोर्चा काढायला हवा

आम. नितेश राणे यांचा टोला; तक्रारदार राऊत यांचाच कार्यकर्ता

⚡कणकवली ता.१७-: खास. विनायक राऊत यांच्या जवळचीच व्यक्ती जर
आम. वैभव नाईक यांच्याविरुद्ध एसीबीकडे करत असेल, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने खास.राऊत यांच्या घरावर मोर्चा काढायला हवा. खासदार राऊत यांना वैभव नाईक का नकोत? त्यांना त्यांच्या मुलाला किंवा मुलीला उभे करायचे आहे का? त्यातले खरे-खोटे काय ते त्यांनाच विचारा, असा गौप्यस्फोट आम.नितेश राणे यांनी केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्यावतीने 18 ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे एसीबी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने
कणकवली येथे पत्रकार
परिषदेत बोलताना आम. नितेश राणे म्हणाले.आमदार वैभव नाईक यांच्याविरुद्ध एसीबीकडे तक्रार केलेला कार्यकर्ता खासदार विनायक राऊत यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्याला वसईमध्ये खासदार विनायक राऊत यांनी घर घेऊन दिले आहे.आमदार नाईक यांच्याविरुद्ध ज्याने तक्रार केली आहे, तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याने आपण तक्रार केली असल्याचे ट्विटरद्वारे म्हटलेले आहे. तो विनायक राऊत यांचा चाहता आहे. वसईत त्याचे राहते घर राऊत यांनी दिले असे त्याचे म्हणणे आहे. जर विनायक राऊत यांच्या जवळची व्यक्ती आमदाराविरुद्ध तक्रार करत असेल, तर मोर्चा एसीबीच्या कार्यालयावर का? तो विनायक राऊत यांच्या घरावर काढायला हवा. हा त्यांच्या पक्षांतर्गतचा विषय आहे. मग ही टीका भाजपवर का? आम्ही कुठे आलोय. याच तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्याला उभे करून आमच्या ‘अधीश’ बंगल्याबाबतही तक्रार करण्यात आली. आता शिवसेनेअंतर्गत श्री. राऊत त्याचा वापर करत आहेत. तक्रारदार श्री. राऊत यांचा समर्थक आहे, त्याचा पुरावाही आमच्याकडे आहे. त्यामुळे भाजपवर आरोप करण्यापेक्षा श्री. राऊत यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपवण्यासाठी ही सारी नाटके चालू आहेत. आमदार नाईक यांना भाजपात कोणीही बोलावलेले नाही. त्यांना कोणी आमंत्रण दिलेय, त्याचा पुरावा द्या. यावेळी श्री. राणे यांनी तक्रारदाराचे ट्विटर हँडल वरील शिवसेनेचे मशाल चिन्ह असलेले फोटो सादर केले. अंतर्गत वादातून हे चालू असून त्यात भाजपची बदनामी का करताय ? आमदार शहाजी बापू पाटील यांनीही या दोन राऊत यांनी वाट लावली असे नुकतेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे खास. राऊत यांचा आमदार नाईक यांना अडचणीत आणण्यामागे त्यांचा काय उद्देश आहे? हे त्यांना विचारा असे श्री. राणे म्हणाले.

You cannot copy content of this page