राजकीय परिस्थितीनुसार घेणार युतीचा निर्णय

भाजप नेते केंद्रीयमंत्री राणे यांनी केले स्पष्ट;परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देणार

⚡सावंतवाडी ता.१६-: परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकर मिळून दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणें यांनी आज येथे दिली. दरम्यान आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये सोयीच्या ठिकाणी होणारी युती त्या वेळच्या राजकीय परिस्थितीनुसार घेणार असल्याचेही राणे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

ते आज सावंतवाडीत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.

यावेळी राणे पुढे बोलताना म्हणाले की  युरोपात आर्थिक मंदीचे सावट असले तरी भारतात ते नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सक्षम आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात आमच्यासारखे मंत्री आहेत. त्यामुळे जागतिक मंदीचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. कोरोना काळात जागतिक स्तरावर मोठा परिणाम झालेला असताना भारतीय अर्थव्यवस्था ढासळू दिली नाही. त्यामुळे काहीही झाले तरी कोणत्याही बाबतीत जनतेला झळ पोहचेल असे होऊ देणार नाही, असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.

तसेच राणे पुढे म्हणाले. कोकणात मी माझ्या लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार आणणार आहे. माझ्या खात्यामार्फत महिलांसाठी क्लस्टर व बचत गटामार्फत रोजगार देण्यात येणार आहे. त्यासाठीचे सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. या उद्योगांमध्ये महिला एससी व एसटी वर्गासाठी तब्बल ३५ टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेली ट्रेनिंग सेंटर देखील लवकरच सुरू करण्यात येणार असून काही रोजगाराभिमुख उद्योगही लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

दोडामार्ग आडाळी एमआयडीसी संदर्भात माझी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. मी त्या ठिकाणी भेट देणार असून तेथे आवश्यक असलेल्या सोयी सुविधा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. काही शिल्लक असलेली कामे मार्गी लागणार आहेत. त्यानंतर पावसाळ्यानंतर तेथील भूखंडांचे वाटप केले जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, संजू परब,अजय गोंदावळे, केतन आजगावकर,बंटी पुरोहित, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page