पोलीस पाटील शासनाचा गावातील महत्वाचा घटक असताना तुटपुंजे मानधन

पोलीस पतीलानी दिले किरण सामंत यांना निवेदन

देवगड प्रतिनिधी
पोलीस पाटील हा गाव पातळीवरील राज्य शासनाचा एक महत्वाचा घटक आहे. पोलीस यंत्रणा आणि जनता यामधील एक महत्वाचा दुवा असून इंग्रजांच्या राजवटीपासून हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झाले आहे. मात्र असे असून देखील पोलीस पाटील यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. तर या मानधनामध्ये सदय स्थितीचा व महागाईचा विचार करुन वाढ करण्यात यावी अशी मागणी देवगड तालुका पोलीस पाटील संघटनेच्यावतीने निवेदनाव्दारे शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.


या निवेदनामध्ये असे नमुद केले आहे की, पोलिस पाटील हा गाव पातळीवरील राज्य शासनाचा एक महत्वाचा घटक आहे. पोलिस यंत्रणा आणि जनता यातील एक महत्वाचा दुवा असून इंग्रजांच्या राजवटी पासुन हे पद महाराष्ट्र राज्यात उपलब्ध आहे. परंतू इतके जुने पद असुन सुद्धा शासन दरबारी ते दुर्लक्षीत राहिले आहे. गावामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखने हे पोलिस पाटलांचे महत्वाचे काम आहे. या शिवाय गावातील अवैध्य धंदे, घातपात, अपघात, अनैसर्गिक मृत्यु, दरोडे, फसवणूक, खुन, मारामाऱ्या, बेपत्ता व्यक्ती, अपहरण, विनयभंग, छेडछाड अशा गोष्टी गावात घडू नये म्हणुन पोलिस पाटील यांना चोविस तास सतर्क रहावे लागते. यासाठी कामाची वेळ ठरलेली नाही. याशिवाय महसुल खात्याची कामे,वन खात्याची कामे, निवडणुक विभागाची कामे, भुमी अभिलेखची कामे, तंटामुक्तीची कामे, गावातील लोकांना दाखले देणे इत्यादी सर्व जबाबदारीची कामे पोलिस पाटील करित असताना त्याना दरमहा फक्त रु.६५००/- (सहा हजार पाचशे मात्र) एवढेच तुटपुंजे मानधन दिले जाते. सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे पोलिस पाटील यांचा पुर्ण वेळ याच कामात जातो. त्यामुळे त्यांना दुसरे कोणतेही काम करता येत नाही. कुटुंबाचा उदर निर्वाह, मुलांचे शिक्षण, आजारपण, कपडा लत्ता या सर्व बाबी मानधनातुनच कराव्या लागतात.
मानधन तुटपुंजे असल्यामुळे संसाराचे गाडे चालवताना पोलिस पाटलांना तारेवरची कसरत करावी लागते. महिन्यातुन १५ दिवस या ना त्या कारणाने तालुक्याच्या ठिकाणी ये जा करावी लागते त्याचा प्रवास भत्ता दिला जात नाही. मानधन हेच पोलिस पाटील यांच्या कुटुंबाच्या उदर्निवाहाचे एकमेव साधन आहे. त्यामुळे गांभियांने विचार करुन पोलिस पाटील यांच्या मानधनात भरघोस वाढ करुन मिळावी.
कोरोना महामारीच्या कालावधीत पोलिस पाटील यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. त्याचा त्यांना कोणताही मोबदला दिला गेला नाही. जेव्हा जेव्हा या देशावर, राज्यावर संकट येईल तेव्हा आमचे पोलिस पाटील सर्वांच्या पुढे राहुन त्या संकटाचा सामना करतील. हे कोरोना महामारीच्या काळात सिद्ध झालेले आहे. गोर-गरीब जनतेचे कैवारी अशी आपली जन माणसात ख्याती आहे. त्यामुळे आमच्या अपेक्षा आनखिनच उंचावल्या आहेत. मानधनात भरघोस वाढ करणे, प्रवास भत्ता वाढवून मिळणे, नुतनीकरण बंद करणे, निवृत्ती नंतर पेंशन देणे, दरमहा वेळेत मानधन देणे इत्यादी महत्वाच्या मागण्या प्रथम मार्गी लावाव्यात अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

You cannot copy content of this page