तान्या च्या कुटुंबियांना मिळाले हक्काचे घर

तानाजी स्मृती निवास कुटुंबीयांकडे सुपूर्द

सावंतवाडी दि.
गरिबी, जगण्यासाठी धडपड सुरू असतानाच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून घराचे स्वप्न साकारल्याने कोळेकर भगिनींच्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अतिशय बिकट परिस्थितीत समाजाने साथ दिल्याचा सुखद अनुभव आज पहायला मिळाला.

येथील क्रिकेटपटू कै.तानाजी कोळेकर यांच्या कुटुंबीयांसाठी सामाजिक बांधिलकीच्या पुढाकारातून बांधण्यात आलेले ” तानाजी स्मृती निवास” घर कुटुंबीकडे सुपूर्त करण्यात आले. तर शासनाने अनेक गरिबांना घरे दिली मात्र कोळेकर कुटुंबीयांना सामाजिक बांधिलकीतून हक्काचे घर मिळाले. यासाठी विषेशतः सावंतवाडी क्रिडाई व अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून हा उपक्रम आपण यशस्वी करू शकलो, असा विश्वास माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केला.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी संकल्प सोडला आणि रवी जाधव, संजय पेडणेकर यांनी सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने स्वप्न साकार केले.
सामाजिक बांधिलकी, राजा शिवाजी चौक मित्र मंडळ, क्रीडाईचे पदाधिकारी-सदस्य आणि इतर दानशूर व्यक्तींच्या उपस्थितीत नूतन वास्तूची पूजा करून कोळेकर भगिनींनी आज आपल्या हक्काच्या घरात प्रवेश केला.
यावेळी तहसिलदार श्रीधर पाटील, क्रीडाईचे अध्यक्ष नीरज देसाई, सतीश बागवे, सुभाष गोवेकर, बाळा घाग,प्रवीण परब, सद्गुरु खोरजुवेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, संजय जाधव, उमाकांत वारंग, किर्ती बोंद्रे,बंटी माटेकर, प्रसाद नार्वेकर, समीरा खलील, शेखर सुभेदार आदीं या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीलाच सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी या उपक्रमाची माहीती दिली ते म्हणाले, कोळेकर कुटुंबीय गेली अनेक वर्षे झोपडीत राहत होते. क्रिकेटपटू तान्याच्या निधनानंतर त्यांच्या तीन बहिणी “त्या” झोपडीत स्वतःचा उदरनिर्वाह करत होत्या. मात्र तिघिंचे उतार वय आणि त्यातच एक बहिण अंथरुणाला खिळलेली, अशा परिस्थितीमुळे त्या पूर्णतः खचल्या होत्या. तर डोक्यावरील छप्पर सुद्धा जीर्ण झाल्यामुळे झोपडीत पावसाळ्यात पाणी येऊन आतील सामानाचे व अन्नधान्याचे नुकसान होते.कोरोना काळात तर त्यांच्यावर मोठे उपसमारीचे संकट आले होते. यावेळी अनेकांनी त्यांना अन्नधान्य स्वरूपात मदतीचा हात दिला. मात्र नंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे त्याचेही नुकसान झाले. त्यामुळे त्यांना कुटुंबीयांना घर बांधून देण्याचा निर्धार केला. ही संकल्पना श्री. साळगावकर यांच्यासमोर मांडल्यानंतर आणि सत्य परिस्थिती कथित केल्यानंतर तेही हेलावून गेले. आणि त्यांनी थेट न विचारता त्या कुटुंबाला घर बांधून देण्याचे जाहीर केले. मात्र छ्प्पराचे काम पुर्ण झाल्यानंतर आर्थिक अडचण समोर आली यानंतर साळगावकर यांनी सावंतवाडी क्रीडाईला आवाहन करताच त्यांनी कुठलाच विचार न करता पुढाकार दिला. त्यानंतर संबंधित घर उभारण्यासाठी मोहीम सुरू झाली.
यावेळी इतरही अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे येत मदतीचा हात दिला. आणि सर्वांच्या प्रयत्नातून हे घर बांधण्यात आले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी विद्युत सुविधा नव्हती. मात्र तीही गैरसोय या उपक्रमातून दूर करून देण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षे काळोखात राहणाऱ्या कोळेकर कुटुंबीयांना आज दिवाळी आधी दिवाळी अनुभवता आली.
यावेळी श्री साळगावरकर यांच्या हस्ते या उपक्रमात मदत करणाऱ्या दानशूरांचा आणि खारीचा वाटा उचलणाऱ्या प्रत्येकाचा सामाजिक बांधिलकीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page