लोकप्रतिनिधींना कामाला जुंपण्यासाठी आंदोलनात्मक जनरेठ्याची गरज: मोहन केळुसकर

⚡कणकवली ता.१३-: कोकण विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही गेली ४४ वर्षें कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. स्थापनेपासून आम्ही मुलभूत विकासासह एस. टी., कोकण रेल्वे,
मुंबई-कोकण-गोवा, पश्चिम किनारी सागरी महामार्ग, पाटबंधारे प्रकल्प आदींच्या पुर्ततेसाठी कायमच संघर्ष करीत आलो आहोत. मात्र आमच्या या संघर्षात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची अभावाने साथ मिळाली. त्यामुळे विकास कामे अनेक वर्षें रखडली आहेत. त्यामुळे यापुढे कोकणवासियांनी विकास कामांच्या पाठपुराव्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना संघटीतरित्या कामाला जुंपण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाद्धारे जनरेठा लावण्याची आवश्यकता आहे, असे भावनात्मक प्रतिपादन कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी मुंबई येथे केले.

कोकण विकास आघाडीचा यंदाचा ४४ सावा वर्धापनदिन
दादर-मुंबई येथील मुख्य कार्यालयात उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यावेळी अध्यक्ष पदावरून केळुसकर बोलत होते. यावेळी पदाधिकारी सूर्यकांत पावसकर, भाऊसाहेब परब, प्रकाश तावडे, रमाकांत जाधव, प्रा. घन:शाम खानविलकर, मनोहर डोंगरे, नरेंद्र म्हात्रे, चंद्रकांत आंब्रे, सुनिल दळवी, गणपत चव्हाण, विलास गांगण, सुरेश गुडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

सागरी महामार्गासाठी तर आम्ही सर्वप्रथम १९७८ पासून कोकणातील किनारी पट्टयातील भागात जनजागृतीसाठी परिषदा घेतल्या. पाटबंधारे प्रकल्पांसाठी रान उठविले.मात्र दुर्दैवाने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी कधीही संघटीतरित्या आवाज उठविला नाही. त्यामुळे असे अनेक प्रकल्प रखडला आहेत, अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले, या दरम्यान राज्यातील उर्वरित भागांमध्ये अलिकडील काळामध्ये जाहिर झालेले प्रकल्प सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे पुर्णत्वास गेले आहेत. म्हणूनच आता कोकणवासियांनी रस्त्यावर उतरून या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची वेळ आली आहे.
यावेळी उपस्थितांनीही लोकप्रतिनिधींच्या या अकार्यक्षम, उदास, पक्षीय भूमिकेबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करतांना सामाजिक जाणीव असलेल्या तरुणांनी विकास कामांच्या पुर्ततेसाठी कोविआच्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन केले.

You cannot copy content of this page