मिरवणूक काढत गुरूचे महत्व देण्यात आले पटवून
⚡सावंतवाडी ता.०२-: अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणिजधाम यांच्या भव्य पादुका दर्शन सोहळा आज सावंतवाडी शहरात पार पडला असून, यावेळी पादुकांची शहरात मिरवणूक काढण्यात आली.
तसेच आपल्या जीवनात गुरूचे महत्व का आहे हे पटवून देण्यात आले.
नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे जनम प्रवचनकार मोहन कुलकर्णी म्हणाले, जीवनात गुरुंची महती जाणून घेऊन गुरुंचे आणि पादुकांचे पूजन केले जाते. श्री प्रभू रामचंद्र वनवासात जात असताना त्यांचा बंधु भरत यांनी पादुकांचे पूजन करून राज्य चालविले त्यामुळे गुरू आणि पादुकांचे पूजन महत्वाचे आहे.
यावेळी गुरुंचे महत्व विशद करण्यात आले.
सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस यंत्रवत बनत चालला आहे. विज्ञानामुळे भौतिक सुखांची मांदियाळी त्याच्या पायाशी लोळण घेत आहे. एका अर्थाने माणसाची प्रगतीच होत आहे. हे जरी खरे असले तरी सुखाच्या हिरवळीवर लोळण घेणारा माणूस अंतःकरणातून मात्र कधी कधी हताश, निराश झालेला आढळतो. कारण आहे मन:शांतीचा अभाव, आत्मिक सुखाचा अभाव. भौतिक सुखे कितीही असली तरी आत्मिक समाधान हे काही वेगळेच असते. आत्मिक समाधानाशिवाय जीवाला पूर्ण समाधान मिळत नाही. यासाठी सांप्रत काळात गुरुमार्गाने जावून आत्मोन्नती साधता येते. ज्यांना ही उच्च कोटीची पर्वणी साधायची नसेल त्यांनी गुरुमार्गाने आत्मिक सुख, मनःशांती मिळवायला काय हरकत आहे ?
गुरुमार्ग म्हटला की नवविधा भक्ती आली. या भक्तीच्या मार्गाने आपल्यातील सकारात्मक उर्जा पुनर्जिवीत करुन जीवनाचा आनंद घ्या. आपल्यातील सकारात्मक उर्जा जागृत होणे म्हणजेच वीलपॉवर वाढणे. उपासना केल्यामुळे जीवन जगताना संयम, समय सूचकता, नेतृत्व गुण, परिपक्वता, चिकाटी, दूरदृष्टीकोन अशा विविध अंगांनी माणूस विकसित होतो. उपासना, माणसातील सकारात्मक विविध अंग विकसित करुन त्या माणसामध्ये आमुलाग्र बदल घडवते. ज्यायोगे आपल्या हातून परोपकार, लिनता, शूरता, ध्येये या गोष्टी अंगीभूत होवून आपल्यामध्ये माणूसकी नावाचा धर्म प्रत्ययास येतो. आजवर अनेकांनी तशी प्रचिती अनुभवली आहे.
आपल्यातील श्रद्धा उपासनेच्या माध्यमातून गुरुचरणी अर्पण करुन दिव्य, महन्मंगल आनंदाचा अनुभव घ्या. जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज नेहमी सांगतात ‘डोळे विज्ञानवादी, मन अध्यात्मवादी आणि बुद्धी वास्तववादी ठेवा’, या त्रिसुत्रीने जीवनात सुख, शांती, समाधान, स्थैर्य, प्रगती साधता येईल. अंधश्रद्धा माणसाला अज्ञानाकडे घेवून जातात. परंतु जी व्यक्ती वरील त्रिसूत्रीचा वापर आपल्या जीवनात करतात, अशा व्यक्ती जीवनाच्या वाटेवर चालत असताना हताश होताना दिसणार नाहीत. सुखात हुरवाळून जाणार नाहीत वा दुःखात कोलमडून पडणार नाहीत. सुखदुःखात खंबीरपणे जगण्याची उमेद उपासनेमुळे येते. आपल्यातील तमोगुण, रजोगुण मानवतेला लाजीरवाणे वाटणारे जीवन जगायला भाग पाडतात. परंतु आपल्यातील सत्त्वगुण जगण्यामध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करतो. जगण्याची उमेद वाढते. सात्त्विकतेमुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलतो. माणूस खऱ्या अर्थाने माणूस म्हणून सात्त्विकताच कारणीभूत असते, असे अनेक साधुसंतांच्या प्रवचनांमधून ऐकावयास मिळते. आपण ही या उपासना कार्यक्रमात उपस्थिती लावून आध्यात्मिक शांतीचा अनुभव घ्यावा. याकरता या सोहळ्याच भव्य आयोजन करण्यात आलं.
स्व. स्वरूप संप्रदाय सिंधुदुर्ग यांनी जिमखाना मैदानावर पादुका व गुरुपूजन सोहळा आयोजित केला होता. यावेळी सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यातील भक्तगण उपस्थित होते. सुमारे १०६ गरजूंना कृषी फवारणी पंप वाटप करण्यात आले. तसेच मुक कर्ण बधीर गरजूंना यंत्र वाटप करण्यात आले.
यावेळी स्व स्वरूप संप्रदाय सिंधुदुर्ग चे दिपक खाडे, जिल्हा निरिक्षक संदीप नार्वेकर, गोवा पीठ व्यवस्थापक अमोल कुलकर्णी,पीठ प्रमुख सुधीन तेंडुलकर, प्रवचनकार मोहन कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष संजू परब,आनारोजीन लोबो, मनोज नाईक, अजय गोंदावळे,केतन आजगावकर तसेच स्व स्वरूप संप्रदाय सिंधुदुर्ग चे संजय सावंत उपस्थित होते.
