जुना रस्ता कायम ठेवत स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याचे दिले आश्वासन
⚡बांदा ता.०१-: मडुरा-सातोसे–सातार्डा–कवठणी-किनळे प्रजिमा ६३ (पर्यायी रस्ता) या रस्त्याचे जिल्हा परिषदेने केलेल्या बांधकामात व रस्ता हस्तांतरणात झालेल्या घोटाळ्याची व भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांच्या कार्यालयासमोर करण्यात येणारे उपोषण छेडण्यात येणार होते. परंतु भाजपा प्रवक्ते तथा सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मध्यस्थी करत, जुना रस्ता कायम ठेवला जाईल व लवकरच सुरु होणाऱ्या उत्तम स्टील या कंपनीत मडुरा दशक्रोशीतील नागरिकांना शंभर टक्के नोकरीची हमी दिल्याने रविवार दि.2 ऑक्टोबर रोजी छेडण्यात येणारे उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती, मडुरा दशक्रोशी रस्ता संघर्ष समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पंडित यांनी दिली.
अनेक वर्षे रखडलेल्या समस्येची दखल संजू परब यांनी घेत मडुरा येथे उपोषणकर्ते, नागरिकांची भेट घेतली व चर्चा केली. तसेच यावेळी जुना रस्ता कायम ठेवला जाईल व लवकरच सुरु होणाऱ्या उत्तम स्टील या कंपनीत मडुरा दशक्रोशीतील नागरिकांना १०० टक्के नोकरीची हमी दिली. हे आपण लघु सूष्म व मध्यम केंदीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून करणार असल्याचे सांगितले. तसेच येत्या पंधरा दिवसात उत्तम स्टील कंपनीचे अधिकारी व मडुरा दशक्रोशितील नागरिकांची बैठक घेऊन जुना रस्ता कायम ठेवणे व मडुरा दशक्रोशितील नागरिकांना नोकरीत प्राधान्य देणार असल्याचे ठोस आश्वासन दिल्याने आजचे २ ऑक्टोबर रोजी करण्यात येणारे उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले आहे. या चर्चेवेळी मडुरा दशक्रोशी रस्ता संघर्ष समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पंडित, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, तसेच सातोसे सरपंच बबन सातोस्कर व मडुरा दशक्रोशीतील अनेक नागरिक उपस्थितीत होते.
