⚡मालवण ता.३०-: केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेत मालवण नगर परिषदेने मालवण शहरात व्यापक स्वच्छता विषयक उपक्रम राबवत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल देशपातळीवर विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित स्वच्छ शहर संवाद समारंभात केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते तसेच गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय जॉइंट सेक्रेटरी आणि राष्ट्रीय राष्ट्रीय मिशन संचालक रूपा मिश्रा यांच्या उपस्थितीत मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे शहर समन्वयक निखिल नाईक हे उपस्थित होते.
स्वच्छ अमृत महोत्सवांतर्गत इंडियन स्वच्छता लीग देशातील एकूण ४३०० शहरांमध्ये राबविण्यात आली होती, या स्पर्धेची सुरुवात कचरामुक्त समुद्रकिनारे, डोंगर आणि पर्यटन स्थळांसाठी युवकांची रॅली या कार्यक्रमाने शुभरंभाने दि. १७ सप्टेंबर रोजी झाली होती. या स्पर्धेचा मूळ उद्देश्य कचरा मुक्त शहर ही संकल्पना व्यापाकतेने राबविणे, देशातील पर्यटन शहरांना अधिक सुंदर व स्वच्छ बनविणे आणि एकंदरीत शहरातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व शहर स्वच्छतेसाठी जनजागृती करणे हा होता. या स्पर्धेअंतर्गत मालवण नगर परिषदेकडून कचरामुक्त समुद्रकिनारे, डोंगर आणि पर्यटन स्थळांसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामूहिक स्वच्छता शपथ घेऊन एकाच दिवसात शहरातील एकूण ८.५ किलोमीटरचा समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला होता. यामध्ये शहरातील शाळा, महाविद्यालय, एनसीसी, एनएसएस, विविध सेवाभावी संस्था, पत्रकार, नागरिक, शहरातील सरकारी कार्यालय कर्मचारी सहभागी झाले होते. या स्पर्धेत मालवण नगर परिषदेने मालवण शहराचा संघ मालवण वॉरियर्स या नावाने नोंद केला होता, नगर परिषदेने एक पर्यटन शहर असल्याकारणाने या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केलेली जनजागृती, या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, सेवभविसंस्था, नागरिक यांचा सहभाग, या कार्यक्रमामुळे शहर स्वच्छतेवर होणारा सकारात्मक परिणाम, शहरातील नागरिकांची स्वच्छतेविषयीची जागरूकता, या कार्यक्रमास मिळालेली प्रसिद्धी व महत्वाचे म्हणजे नगर परिषदेकडून केंद्र शासनाला डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून करण्यात आलेले सादरीकरण या सर्वाचे परीक्षण करण्यात आले होते. या सर्वांतून मालवण नगरपालिकेचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय स्तरावर गौरव करण्यात आला. पर्यटन नागरी असलेल्या मालवण शहराचा केंद्र स्तरावर झालेला सन्मान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला नव्या उंचीवर नेणारा ठरणार आहे.
मालवण वासीयांच्या स्वच्छता विषयक सजगतेमुळे सन्मान शक्य- मुख्याधिकारी श्री. जिरगे
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, जिल्ह्याचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक, शिक्षण मंत्री व जिल्ह्याचे माजी पालक मंत्री दीपक केसरकर, स्वच्छ महाराष्ट्र अभियानचे संचालक समीर उन्हाळे व स्वच्छ महाराष्ट्र अभियानची संपूर्ण टीम, कोकण विभाग आयुक्त, उपयुक्त, माजी नगरसेवक, व्यापारी, मच्छीमार, सामाजिक संस्था यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, शहर वासीयांचा सहभाग, नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी यांच्या मेहनातीमुळे मालवण शहर या बक्षिसास पात्र ठरले असे मत नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी व्यक्त केले, केंद्र शासनाकडून झालेल्या या सन्मानामूळे जबाबदारी अजून वाढलेली आहे व या वर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये सुद्धा मालवण वासीयांच्या सहकार्याने शहराला चांगला क्रमांक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, या प्रयत्नात कचरा मुक्त शहर करण्यासाठी, कचरा विरुद्ध लढण्यासाठी सर्व मालवण वासीयांनी तयार राहावे व मालवण शहराला एक स्वच्छ शहर म्हणून देशपातळीवर नावारूपास येण्यास सज्ज राहावे, असे आवाहनही श्री. जिरगे यांनी केले आहे.
