केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन
वैभववाडी संजय शेळके
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांच्या रूपाने कर्तुत्ववान व्यक्तिमत्व आपण अनुभवलं आहे. म्हणूनच त्यांची ख्याती जगात यशस्वी पंतप्रधान अशी राहिली आहे. असे गौरवोद्गार केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी वैभववाडी येथे काढले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात भाजपाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 172 जणांनी विक्रमी रक्तदान केले. यावेळी मंत्री नारायण राणे साहेब यांनी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांशी संवाद साधला. व त्यांची विचारपूस केली. दरम्यान रक्तदान शिबिराचे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती जयेंद्र रावराणे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, सज्जन काका रावराणे, राजेंद्र राणे, सुधीर नकाशे, हुसेन लांजेकर, प्राची तावडे, बंड्या मांजरेकर, संजय सावंत, नवलराज काळे,विवेक रावराणे, रोहन रावराणे, डॉ. राजेंद्र पाताडे, महेश संसारे, बाळा हरयाण, किशोर दळवी, बाबा कोकाटे, संताजी रावराणे, विजय तावडे, राजू पवार, स्नेहलता चोरगे, शारदा कांबळे, अक्षता डाफळे, संगीता चव्हाण, यामिनी वळवी, सुंदरा निकम, सुप्रिया तांबे, राजन तांबे, शुभांगी पवार, राजू पडवळ, हर्षदा हरयाण, प्रकाश पाटील, पुंडलिक साळुंखे, प्रकाश सावंत, प्रदीप जैतापकर, प्रदीप नारकर, उदय पांचाळ, भालचंद्र रावराणे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नारायण राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा म्हणून साजरा होत आहे. या उपक्रमात कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून मी खूप समाधानी आहे. वैभववाडी भाजपा सर्व उपक्रम जबाबदारीने राबवत आहे. याचा सार्थ अभिमान आहे. रक्तदान हे पवित्र कार्य आहे. रक्ताची किंमत पैशात होऊच शकत नाही. यातून अनेक व्यक्तींचा जीव वाचू शकतो.
माझा जास्त वेळ प्रवासात जातो. त्यामुळे थकवा येतो. परंतु जेव्हा मी कार्यकर्त्यात येतो. तेव्हा खूप बरे वाटते. थकवा, मरगळ निघून जातो. कामात प्रत्येकाने सातत्य ठेवा, कामे जनतेपर्यंत पोहोचवा, सेवा करणारे कार्यकर्ते बना असे नारायण राणे साहेब यांनी सांगितले. मागास तालुका हा शब्द आता पुसून टाका. या तालुक्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी माझ्या खात्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. एमएसएमई च्या माध्यमातून तालुक्यात उद्योग उभारले पाहिजेत. उद्योग उभारणीत लागणारे कर्ज एमएसएमई द्यायला तयार आहे. आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेऊन याबाबत शिबिर क्षक्ष. प्रत्येकाने दहा ते बारा युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. उद्योग व्यवसायात आपण कमी नाही हे दाखवून द्या. यासाठी लागेल ती मदत, सहकार्य करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे राणे साहेब यांनी सांगितले.
चौकट
वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे सेवेसाठी प्रयत्नशील
हा रेल्वे मार्ग लवकर सुरू होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. रेल्वेमंत्री यांची लवकरच भेट घेऊन त्यांना प्रकल्पाबाबत पत्र देणार असल्याचे नारायण राणे साहेब यांनी सांगितले. आमदार नितेश राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. भाजपा कार्यकर्ते जनतेची सेवा करून वाढदिवस साजरा करत आहेत. आदरणीय नारायण राणे साहेब यांचे तालुक्यावर खूप प्रेम आहे. त्यांनी या तालुक्याला विकासात वाटा भरपूर दिला आहे. तालुक्याला वैभवशाली बनविण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत असे सांगितले. नासीर काझी यांनी वैभववाडी भाजपाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा निमित्त उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रज्जब रमदूल यांनी मानले.
