शासकीय योजनांसाठी ई पीक नोंदणी अत्यावश्यक : व्ही एस कविटकर

मडुरेत ई पीक नोंदणीसाठी मार्गदर्शन

⚡बांदा ता.३०-: शासन निर्देशानुसार शासकीय योजना तसेच नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान भरपाई मिळविण्यासाठी ई पीक नोंदणी असणे आवश्यक आहे. ई पीक अॅपच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी सातबारावर पीकाची नोंदणी करावी, असे आवाहन मडुरा सजा तलाठी व्ही. एस. कविटकर यांनी मडुरा येथे शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना केले.
ते म्हणाले, सुधारित मोबाईल अॅपमध्ये प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट असतात. शेतकरी ज्यावेळी पीकाचा फोटो घेतील त्यावेळी फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदू पर्यंतचे अंतर आज्ञावलीत दिसणार आहे. पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून शेतकरी दूर असल्यास तसा मेसेज मोबाईल अॅपमध्ये दाखविण्यात येणार आहे. मोबाईल अॅपद्वारे नोंदविलेली पीक नोंदणी चुकीची झाल्यास ४८ तासांच्या आत त्यामध्ये बदल करण्याची सुविधा दिलेली आहे.
किमान आधारभूत योजनेंतर्गत येणाऱ्या पीकांची ई पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास ई पीक पाहणी अॅपमध्येच शेतकर्‍यांना आपणास किमान आधारभूत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का असा प्रश्न विचारला जाणार आहे. शेतकर्‍यांनी होय असा पर्याय निवडल्यास अशा सर्व शेतकर्‍यांची माहिती वेब प्रणालीद्वारे पुरवठा विभागाकडे प्राप्त होणार आहे. त्यामुळे किमान आधार योजनेंतर्गत अशा शेतकर्‍यांची आपोआपच नोंदणी होणार आहे.
या अॅपमध्ये एक मुख्य पीक व अन्य तीन दुय्यम पीके नोंदणी करण्याची मुभा आहे. त्याचप्रमाणे दुय्यम पिके लागवडीचा दिनांक, हंगाम व क्षेत्र नोंद करण्याची सुविधा आहे. त्यामुळे दुय्यम पिकांची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल. अॅपमध्ये मदत पर्याय निवडल्यास नेहमी विचारले जाणारे प्रश्न व त्याची उत्तरे मिळणार आहेत. या अॅपबाबत अभिप्राय नोंदण्याची सुविधा सुद्धा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मडुरा सोसायटी माजी चेअरमन ज्ञानेश परब, बाळू गावडे, यशवंत माधव, माजी उपसरपंच उदय चिंदरकर, दत्ताराम परब, रामा परब, दिनेश परब, केशव परब, प्रितेश गवंडी, संभाजी परब, कोतवाल नाना वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page