अर्चना घारे-परब : जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी साधणार संवाद
बांदा/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचे पक्षाच्या वतीने सकाळी ९.३० वाजता बांदा कट्टा कॉर्नर चौकात भव्य स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला आघाडी अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, जिल्हा उपाध्यक्ष असिफ शेख, रत्नागिरी पक्ष निरीक्षक सौ. दर्शना बाबर-देसाई, सावंतवाडी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, हिदायतुला खान आदी उपस्थित होते.
श्री पवार हे वेंगुर्ले येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या वतीने त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य स्वागताचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता स्वागत केल्यानंतर ते जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत. यावेळी येथील विविध समस्या, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत श्री. पवार यांना निवेदने देण्यात येणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील पक्षाचे बेसिक व युवकचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. स्वागत कार्यक्रम झाल्यानंतर श्री पवार हे वेंगुर्ले येथे रवाना होणार आहेत. बांदा येथे स्वागत सोहळ्याला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सौ. घारे-परब यांनी यावेळी केले.
फोटो :-
बांदा येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना सौ. अर्चना घारे-परब. सोबत पुंडलिक दळवी, दर्शना बाबर – देसाई व इतर. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
