न्हावेली येथे भरवस्तीत वाघाचे दर्शन

रात्रीच्या सुमारास फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

⚡सावंतवाडी ता.२९सहदेव राऊळ-: न्हावेली गावात गेले काही दिवस भरवस्तीत सातत्याने वाघाचे दर्शन होत आहे. रात्रीच्या सुमारास हा वाघ भरवस्तीत फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

न्हावेली येथील मेस्त्रीवाडी न्हावेलकरवाडी, टेंबवाडी येथे गेले बरेच दिवस वाघाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळी हा वाघ बेधडक मनुष्य वस्तीत फिरताना दिसून आला आहे. न्हावेली येथील सी. एन. न्हावेलकर यांच्या घरामागच्या पडवीत वाघ दिसून आला. पडवीत कोणतेही जनावर नसल्याने अनर्थ टळला. सोमवारी टेंबवाडी येथील गोपाळ मांजरेकर यांच्या कुत्र्यावर या वाघाने झडप घालण्याचा प्रयत्न केला असता भीतीने बाकीचे कुत्रे इतराच्या सरात घुसले. तसेच दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्याच वाडीतील चार कुत्रेही या वाघाने पळविले आहेत. रात्री साडेनऊ ते पावणे दहाच्या सुमारास वाघ फिरत असल्याचे निदर्शनास आले. मात्र ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यामुळे वाघ पळाला. त्यामुळे येथे वाघाचा मुक्त संचार पहाण्यास मिळतो. न्हावेलकरवाडी, टेंबवाडी, मेस्त्रीवाडी बाहेर फिरणेही येथील ग्रामस्थांना धोक्याचे झाले आहे. हल्लीच्या काळात जंगली प्राण्यांचा मानव वस्तीत वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाघ, बिबट्या हे प्राणी मोठ्या प्रमाणात भरवस्तीत घुसत आहेत. भरवस्तीत घुसून माणसांवर हल्ला तसेच पाळीव प्राण्यांचा फडशा या प्राण्यांकडून पाडला जात आहे. न्हावेली येथील या सर्व वाडीतही मनुष्य वस्ती जास्त आहे. तसेच पाळीव जनावरेही आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. त्यामुळे वनविभागाने या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी न्हावेली ग्रामस्थांनी केली असून जर गावातील लोकांना या वाघापासून त्रास झाल्यास याला सर्वस्वी वनखाते जबाबदार राहणार आहे, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

You cannot copy content of this page