पोलीस पाटीलांची रिक्त पदे भरावीत – भानुदास येरागी

⚡मालवण ता.२८-: तुटपुंजे मानधन, प्रशासकीय विभागांकडून पोलीस पाटीलांकडून करून घेतली जाणारी विविध कामे आणि त्यातच एकाच पोलीस पाटीलकडे असणारा अतिरिक्त गावांचा पदभार यामुळे पोलीस पाटीलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, पोलीस पाटीलांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सरकारने निवडणुकीपूर्वी रिक्त पोलीस पाटील पदे भरावीत अशी मागणी पोलीस पाटील जिल्हा संघटनेचे समन्वयक भानुदास येरागी यांनी केली आहे.

पोलीस पाटील पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना सध्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वाढलेली महागाई, तीन चार महिन्यांनी कधीतरी मिळणारे एक किंवा दोन महिन्याचे मानधन, विविध प्रशासकीय कामांकरिता वेगवेगळ्या कार्यालयांकडून पोलीस पाटील या सवर्गाकडून करून घेतली जाणारी कामे त्यामुळे शासन निर्णयात नमूद असून देखील पोलीस पाटीलकी व्यतिरिक्त कुटुंबाच्या चरितार्थासाठी व अर्थार्जनासाठी अन्य काम धंदा करण्याची नामुष्की अनेक पोलीस पाटीलांवर येत आहे. वाढलेला कामाचा व्याप पाहता शासनाकडून मिळणारे मानधन हे फारच तुटपुंजे आहे. याबाबत राज्य संघटनेने वेळोवेळी शासन दरबारी आवाज उठविला आहे. मिळणारे मानधन हे व सद्यस्थिती पोलीस पाटील यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त गावांच्या पदभार यामुळे एक पोलीस पाटील तीन ते चार गाव सांभाळत आहेत. मात्र मिळणारे मानधन हे एका गावासाठी काम करताना मिळत आहे तेवढेच मिळते. त्या ६५०० रुपयांचा विचार करता पोलीस पाटील हे तालुक्याच्या ठिकाणी तसेच आपल्या कामाच्या अनुषंगाने फिरतीवर असताना वाढलेले पेट्रोलचे भाव विचारात घेता त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनेक पोलीस पाटील यांना अनियमित मिळणाऱ्या मानधनामुळे कर्ज काढून मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवाव्या लागलेल्या आहेत. कित्येक पोलीस पाटीलांना सण-उत्सव देखील वेळेत मानधन न झाल्यामुळे उसनवारी किंवा कर्ज काढून करावे लागत आहेत. त्याचबरोबर या सर्व घडामोडी, जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेता येणाऱ्या निवडणुकीपूर्वी पोलीस पाटील पदाची रिक्त पदे भरण्यात यावी, असेही भानुदास येरागी यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page