जिल्हा परिषदेची बांदा केंद्र शाळा आदर्शवत

मॉडेल म्हणून पटसंख्या वाढीसाठी झाला पाहिजे अभ्यास;आ नितेश राणे यांचे प्रतिपादन

बांदा,दि.27(प्रतिनिधी)
सद्यस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची पटसंख्या पाच, दहा, चाळीस जास्तीत जास्त पन्नासच्यावर जात नाही. मात्र बांदा केंद्र शाळेची पटसंख्या तीनशेच्यावर आहे. महत्त्वाचे म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी बांधलेली बांदा केंद्रशाळा अजूनही सुस्थितीत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक व शिक्षकांचे कौतुक केले पाहिजे. कारण राज्यातच नव्हे तर देशात एक आदर्श घडवून दिला आहे की शाळा कशी चालवायची. तीनशेच्यावर पटसंख्या असलेल्या अशा शाळेचे महाराष्ट्र सरकारने मॉडेल तयार करून आपण जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कशी वाढू शकतो यावर योग्य पध्दतीने मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे उदगार, आमदार नीतेश राणे यांनी काढले.
जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर 1 बांदा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. नितेश राणे, माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे, माजी जि. प. सदस्य श्वेता कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर, बांदा लायन्स क्लबचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे, तसेच मंदार कल्याणकर, संदिप बांदेकर, उदय धुरी, रुपाली शिरसाट, मानसी धुरी, लक्ष्मी सावंत, रत्नमाला वीर, रिया अल्मेडा, उमांगी मयेकर, बाबा काणेकर, बाळा आकेरकर, मकरंद तोरसकर, जावेद खतीब, ज्ञानेश्वर सावंत, रविंद्र सावंत, मधुकर देसाई, विलास पावसकर, आबा धुरी, वसंत जाधव, आत्माराम गावडे, विनेश गवस आदी उपस्थित होते.
आमदार श्री. राणे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात बांदा केंद्र शाळासारखे पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शाळा असतील तर महाराष्ट्र सरकारने त्याचा अभ्यास करून योग्य पध्दतीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. शैक्षणिकदृष्टय़ा मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी पालघर येथील जिजाऊ संस्थेचे नीलेश सांबरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल एक लाख वह्यांचे वाटप सुरू आहे. असे दातृत्व काही क्वचितच व्यक्तींकडे असतात. कोकणच्या विकासासाठी जो कोणी हातभार लावेल त्याला प्रत्येकाने पाठींबा दिला पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्रित येणे गरजेचे आहे, असे सांगत नीलेश सांबरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने नितेश राणे यांनी आभार मानले.
जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्रचे नीलेश सांबरे म्हणाले की, कोकणातील कुठचाही रूग्ण उपचाराशिवाय दगावताकामा नये आणि कुठचाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहताकामा नये यासाठी गुजरातच्या सीमेपासून गोव्याच्या सीमेपर्यंत महाराष्ट्रात ही संस्था काम करत असल्याचे सांगत संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली.

यावेळी गणेशोत्सव सजावट तसेच निबंध स्पर्धा अशा अनेक स्पर्धांत नावीन्य मिळवलेल्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक जे डी पाटील यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी केले. आभार शालेय शिक्षण समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांनी मानले.

फोटो———
बांदा केंद्र शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्यानंतर मान्यवर. (छाया : विश्वनाथ नाईक)

You cannot copy content of this page