बंदर विभाग आणि जलक्रीडा व्यावसायिक बैठक संपन्न

एक खिडकी सुविधेसह जलक्रीडाचे दर करण्यात आले निश्चित

मालवण (प्रतिनिधी)

गेली काही वर्षे जलक्रीडा व्यवसायात वादातीत बनलेल्या समान तिकीट दर निश्चितेची एक खिडकी योजना व्हावी यासाठी मालवणच्या बंदर विभागाने पुढाकार घेत आज या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत जलक्रीडा व्यवसायाचे दर निश्चित करताना एक खिडकी योजना व्हावी यासाठी ठोस निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेतानाच जलक्रीडा व्यवसायातील कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांसाठी नियम व अटी ठरविण्याच्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावर संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांबरोबर व्यावसायिकांची येत्या आठवड्याभरात पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मालवण बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी दिली आहे.

मालवण धुरीवाडा येथील संस्कार हॉल मध्ये आयोजित या बैठकीस बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील, सहायक बंदर निरीक्षक श्री. परदेशी, जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, शहराध्यक्ष मंगेश जावकर, रुपेश प्रभू, राजेंद्र परुळेकर, सौ. अन्वेषा आचरेकर, सौ. मीनल परब, संतोष परब, मनोज खोबरेकर, सचिन गोवेकर, वैभव खोबरेकर, हेमंत रामाडे, दामू तोडणकर, सहदेव बापर्डेकर, गोविंद धुरी, केदार झाड, जगदीश तोडणकर,योगिता कांबळी , समीक्षा खोबरेकर, कांचन खराडे , एजाज मुल्ला, निखिल ढोके, कलमेश ढोके आदी व इतर व्यावसायिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित व्यावसायिकांनी एक खिडकी होण्याबाबत आपले विचार मांडत बहुतांशी व्यावसायिकांनी एक खिडकीच्या बाजूने सहमती दर्शवली. मात्र सर्व व्यावसायिक उपस्थित नसल्याने याबाबत ठोस निर्णय होऊ शकला नाही. एक खिडकी योजना झाल्यास दर समान ठेवून नंबर पद्धती प्रमाणे करावी, व्यावसायिक एका छताखाली आल्यास शासनाने लेव्ही घेऊन बंदर विभागाकडून शासनाची तिकीट पावती देण्यात यावी. तसेच व्यावसायिकांना आवश्यक त्या सुविधा शासनाने पुरवाव्यात असे मत यावेळी मांडण्यात आले.

एक खिडकी झाल्यास व्यावसायिक चांगली सेवा देऊ शकतील, यातून जलक्रीडा सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढू शकते. एक खिडकी झाल्यास नवीन व्यवसायिकास त्यामध्ये घेऊ नये, किंवा घेण्याबाबत सर्व व्यावसायिकांचे ना हरकतीचे मत घेऊनच प्रवेश देता येईल, अशी चर्चाही यावेळी करण्यात आली.

यावेळी दर निश्चिती बाबत जलक्रीडा व्यावसायिकांमध्ये एकमत होऊ शकले नाही. यावेळी स्कुबा डायविंग, वॉटरस्पोर्ट्स व पॅरासेलिंग या तीन प्रकारात जलक्रीडांचे देवबाग, तारकर्ली, दांडी, मालवण बंदर जेटी, चिवला बीच व सर्जेकोट येथील व्यावसायिकांचे दर जाणून घेऊन त्यामधून सगळीकडे समान दर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये स्कुबा डायविंग १५०० रु., वॉटरस्पोर्ट्स ८०० रु. आणि पॅरासेलिंग ८०० व दुहेरी साठी १२०० असे दर तर पूर्ण पॅकेज ३१०० रु. देण्याबाबत चर्चा झाली. मात्र या दराबाबत एका व्यावसायिकाने असमाधान व्यक्त करत या दरांच्या दुप्पट दर ठेवावेत आणि दर्जेदार सेवा द्यावी असे सांगितले. तर आधीच दर कमी असल्याने आता नवीन जास्तीचे दर निश्चित केल्यास पर्यटकांचा ओघ कमी होईल अशी चिंताही यावेळी काही व्यावसायिकांनी व्यक्त केली. तर यावेळी जलक्रीडेसाठी गोव्यातून मालवणात आणल्या जाणाऱ्या पर्यटकांना प्रत्येकी १५०० ते १८०० रुपये या प्रमाणे जलक्रीडेचे पॅकेज देण्यात यावे अशी चर्चाही यावेळी झाली.

आजच्या या बैठकीत जलक्रीडा व्यवसायात समान तिकीट दराच्या दृष्टीने एक खिडकी सुरू करावी, तसेच जलक्रीडेचे दर निश्चित करण्यात आल्याची माहिती बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी देतानाच आजच्या बैठकीत काही जलक्रीडा व्यावसायिक उपस्थित न राहिल्याने त्यांना आजच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यात येणार असून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तसेच ज्या जलक्रीडा व्यवसायात एक खिडकी योजना सुरू झाल्यानंतर त्या अनुषंगाने येणारी नियम आणि अटी ठरविण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर या संबंधित व्यवसायाशी निगडित असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची येत्या आठवड्या भरात बैठक घेण्याचे ठरविण्यात आल्याची माहितीही श्री. पाटील यांनी दिली.

You cannot copy content of this page