मडुरा बाबरवाडीत धोकादायक स्थिती
⚡बांदा ता.२०-: मडुरा – बाबरवाडी येथे ११ केव्ही विद्युत तारांच्या हद्दीवरुन बांदा सहाय्यक अभियंता १ व २ या दोघा अधिकार्यांमध्ये मतभेद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्युत वाहिन्यांवरील झुडपांची सफाई कोणी करायची असा प्रश्न उभा राहिला आहे. धोकादायक परिस्थिती ओळखून महावितरणने आपापसातील मतभेद मिटवून तातडीने झुडपांची सफाई करण्याची मागणी बाबरवाडीतील युवकांनी केली आहे.
मडुरा बाबरवाडी येथून कास – शेर्ले सीमेवरील डिवायन मर्सी येथे ११ केव्हीच्या विद्युत तारांची जोडणी करण्यात आली आहे. सदर वाहिनीवर झुडपे वाढल्याने स्पार्किंग होण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवाय ११ केव्हीच्या खाली बाबरवाडी स्ट्रीट लाईन असून स्पार्किंगमुळे आतापर्यंत ९० हून अधिक बल्बचे नुकसान झाले आहे. भविष्यात स्पार्किग होऊन आग लागण्या बरोबरच अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणने तातडीने झुडपांची सफाई करण्याची मागणी बाबरवाडीतील युवकांनी महावितरणकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मडुरा – बाबरवाडी येथे ११ केव्हीच्या तारा ठिकठिकाणी स्पार्क होत असल्याने आगीच्या ठिणग्या वारंवार उडत असतात. अनेक वर्षांपासून झुडपांची सफाई करण्यात न आल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार महावितरणच्या अधिकार्यांना समज देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे बाबरवाडीतील युवकांनी बांदा सहाय्यक अभियंता अनिल यादव यांना निवेदन सादर केले.
मात्र, ११ केव्ही लाईन हद्दीवरुन बांदा सहाय्यक अभियंता १ चे अभियंता कोहळे व २ चे अभियंता अनिल यादव यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. झुडपे सफाईची जबाबदारी कोणाची यावरुन मतभेद पहायला मिळाले. येत्या ८ दिवसात झुडपांची सफाई करण्याची मागणी शैलेश धुरी, दिगंबर धुरी, स्वप्निल धुरी, लाडू धुरी, तुषार धुरी, रितेश पावसकर, परशुराम धुरी यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा होणार्या दुष्परिणामांना महावितरण जबाबदार असल्याचा इशाराही दिला आहे.
फोटो –
मडुरा बाबरवाडी येथे अशाप्रकारे ११ केव्हीच्या तारा चिकटल्याने स्पार्किंग होत आहे.
