बांदा/प्रतिनिधी
असनिये गावचे माजी सरपंच, भाजप कार्यकर्ते तथा श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक गजानन लाडू सावंत (वय ५२) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कुडाळ येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक अकाली निधनाने सावंत कुटुंबीयांसह असनिये, बांदावासिय व त्यांच्या मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील एका दातृत्ववान व्यक्तीला मुकल्याने असनिये गावावर शोककळा पसरली. सोमवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले.
आपल्या सरपंच पदाच्या कालावधीत त्यांनी अनेक सोयी व सुविधा उपलब्ध करून गावाच्या सर्वांगीण विकासाला दिशा दिली होती. असनिये गावच्या मायनिंग विरोधी लढ्यातही त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यांनी गावातील लोकांची एकजूट निर्माण करून गावाच्या शैक्षणिक, क्रिडा, सामाजिक व धार्मिक विकासात योगदान दिले होते. ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रस्थानी असायचे. श्री वाघदेव उत्कर्ष कला व क्रिडा मंडळाचे ते अध्यक्ष होते. बांदा लायन्स क्लबचे ते सहसचिव होते. रविवारी कुडाळ येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी सक्रियपणे सहभाग घेतला होता. ते भाजपचे क्रियाशील कार्यकर्ते होते. त्यांचे राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील वरिष्ठाशी सलोख्याचे संबंध होते.
असनिये हायस्कूलच्या शिक्षिका जान्हवी सावंत यांचे ते पती, मळगाव हायस्कूलच्या शिक्षिका गीता सावंत- मोर्ये यांचे ते भाऊ होत तर असनिये माजी सरपंच एम डी सावंत आणि प्रगतशील बागायतदार जनार्दन सावंत यांचे ते पुतणे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ, एक बहीण, काका, काकी, चुलत भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे. आज असनीये येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
फोटो :-
गजानन सावंत.
असनिये गावचे माजी सरपंच गजानन सावंत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…
