वेंगुर्ल्यामध्ये मुलांना पळवून नेणारी टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारली

संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुक्यात सद्या सोशल मिडियावर ‘मुलांना पळवून नेणारी टोळी वेंगुर्लेत‘ असा मेसेज फिरत असून यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान वेंगुर्ला पोलीसांनीही या संदर्भात चौकशी सुरु केली असून अशा प्रकारची टोळी असण्याची शक्यता त्यांनी प्रथम दर्शनी नाकारली आहे. मात्र, शहरात किवा तालुक्यात कोणी संशयास्पद व्यक्ती किंवा घटना नागरिकांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

  वेंगुर्ला तालुक्यातील एका हायस्कूलच्या आवारात प्रसाद वाटण्याच्या निमित्ताने आलेल्या व प्रसाद घेण्यास मुलांनी नकार देताच पलायन केलेल्या ओमनी चालकामुळे संबंधित ओमनी मूले पळवून नेणा-या टोळीपैकी असावी या संशयातून घबराट पसरली आहे. या संदर्भात वेंगुर्ला पोलीस स्टेशनमध्ये त्या हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी घडलेल्या प्रकारची तक्रार वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दिली आहे.

  हा प्रकार पाच दिवसापूर्वी त्या हायस्कुलच्या आवारात घडला. एक अज्ञात ओमनी आत आली. त्यावेळी हायस्कूलमधील मुले पटांगणात फिरत होती. यावेळी त्या ओमनी चालकाने मुलांना प्रसाद घ्या असे सांगितले. मात्र मुलांनी प्रसाद घेण्यास नकार दिला व आम्ही सरांना विचारुन येतो असे सांगताच सदर ओमनी चालक तिथून पसार झाला. सदरची घटना मुलांनी शाळेच्या मुख्याद्यापकांना सांगताच मुख्याद्यापक यांनी मुलांसमवेत पोलीस स्टेशन गाठून याची खबर दिली.

  या टोळी विषयी प्रत्येक शाळेत शिक्षक खबरदारीच्या सूचना देत आहेत. परंतु संबंधित मॅसेज सोशल मीडियावर फिरत असल्याने पालकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे. या संदर्भात वेंगुर्ला पोलीस निरिक्षक अतुल जाधव यांच्याशी संफ साधला असता त्यांनी येथील एका हायस्कुलच्या मुख्याद्यापकाने मुलांसमवेत येवून त्या घटने संदर्भात खबर दिली असल्याचे सांगितले. त्यानुसार आपण त्या हायस्कुलच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या दिवशी त्या हायस्कुलच्या आवारात कोणतीही ओमनी गेल्याचे दिसत नाही. मुलांच्या व मुख्याद्यापकांच्या मते त्या ओमनीमध्ये एकच माणूस होता. एकटा माणूस भर दुपारच्या वेळेत, रस्त्याच्या कडेला असलेल्या हायस्कुलमध्ये आवारात बरीच मुले असताना मुलांना पळविण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे हा मुले पळवून नेण्याचा प्रकार असण्याची शक्यता कमी आहे. तरीही आम्ही तपास करीत आहोत. अशाप्रकारच्या संशयास्पद घटना घडल्यास किवा संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास नागरिकांनी कायदा हातात न घेता त्वरीत पोलीस स्टेशनशी संफ साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
You cannot copy content of this page