प्रमिता तांबे संपादीत ‘आहे भविष्य अपुल्या हाती’ शैक्षणिक ग्रंथाचे २४ रोजी कणकवलीत प्रकाशन

जिल्ह्यातील अकरा कृतिशील शिक्षकांच्या शैक्षणक प्रगतीचा मागोवा घेणारा ग्रंथ

⚡कणकवली ता.२०-: जिल्ह्यातील काही जि. प. प्रा. शाळेतील विद्यार्थी खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेपेक्षा एक पाऊल पुढेच प्रगती करत आहेत. याला त्या, त्या शाळेतील गुणवंत शिक्षकांचे परिश्रमही कारणीभूत आहेत. जिल्ह्यातील अशा ११ शिक्षकांच्या गुणात्मक प्रगतीचा मागोवा घेणारा ‘आहे भविष्य अपुल्या हाती” हा ग्रंथ कवयित्री प्रमिता तांबे यांनी संपादीत केला आहे.

प्रभा प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शनिवार २४ सप्टेंबर रोजी दु. ३ वा. येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा शिक्षण अधिकारी महेश धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. तर कवी तथा समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांच्या हस्ते उद्घघाटन होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, मालवण गटशिक्षणाधिकारी संजय माने आदिंना निमंत्रित करण्यात आले आहे.
मराठीतील ज्येष्ठ लेखक तथा शिक्षण सहाय्यक संचालक नामदेव माळी यांनी या ग्रंथाला प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ते म्हणतात “आहे भविष्य अपुल्या हाती” या ग्रंथामध्ये एकूण 11 शिक्षकांविषयी लेखन आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या शिक्षकांचे बालपण खडतर परिस्थितीमध्ये व कष्टात गेलेले आहे. त्यांनी परिस्थितीवर मात करत कष्टपूर्वक आपले शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या पूर्वायुष्याची जाणीव ठेवून गोरगरिबांची – कष्टकऱ्यांची मुले शिकतील आणि त्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळेल म्हणून त्यांची धडपड सुरू आहे. यातून हा ग्रंथ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजची शैक्षणिक गुणवत्ता मांडतो आणि गुणवान शिक्षकांची गुणवत्तेची बाजू लोकांसमोर आणतो. हे या पुस्तकाचे मोल आहे. तर श्रीमती तांबे यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ज्या शिक्षकांचे विद्यार्थी सातत्याने चमकदार कामगिरी करतात अशा काही शिक्षकांचे मनोगत वजालेखन प्रातिनिधिक स्वरूपात या ग्रंथात घेण्यात आले आहे.या ग्रंथातील शिक्षकांची प्रयोगशीलता सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचेलच शिवाय जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण शिक्षकांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक आणि प्रेरणाही ठरेल अशी आशा वाटते.तरी या कार्यक्रमात सर्व शिक्षक प्रेमींनी सहभागी व्हावे; असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page