शिरवंडे हायस्कूलचे मुख्याध्यापक वामन तर्फे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

⚡कणकवली ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाच्यावतीने देण्यात येणारे विविध पुरस्कार नुकतेच जाहीर होऊन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यात जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता. मालवण या शाळेचे मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांना महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री ना.दिपक केसरकर यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.


गेली अठ्ठावीस वर्षे शिरवंडे सारख्या ग्रामीण भागात शैक्षणिक कार्यकरत असताना सामाजिक संघटनात्मक, सांस्कृतिक, धार्मिक आणि वैद्यकीय सुविधा पुरविणे या क्षेत्रात श्री. तर्फे विविध संस्थाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करुन शिरवंडे या विनाअनुदानित शाळेत आपले शैक्षणिक कार्य सुरु करून संस्थेने अडचणीच्या काळात मुख्याध्यापक पदाची सोपविलेली जबाबदारी पार पाडत असताना शैक्षणिक प्रगती बरोबरच शाळा उभारणीच्या कार्यात संस्था, ग्रामस्थ, पालक, सहकारी यांना बरोबर घेऊन कठोर परिश्रम घेतले आणि त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या शाळेला नावलौकीक मिळवून दिले. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक संघटनात्मक वैद्यकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी जिल्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या प्रथम कार्याला (शाळा) प्राधान्य देताना विविध संस्था ते सांभाळत आहेत. कै. सिताराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जांभवडे पंचक्रोशीतील गरजूंना विविध मार्गानी मदत करण्याचे काम ते करत आहेत. त्यांचा कोरोनाच्या काळातील लोकसहभागातून रुग्णवाहिका हा उपक्रम स्तुत्य होता. ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असताना गरीबिची झळ सोललेल्या व जाणीव असलेल्या तर्फे सरांनी स्वतः अनेक गरजूंना अडचणीच्या काळात आर्थिक मदत केलेली आहे.प्रचंड लोकसंपर्क असल्याने त्यांना त्यांच्या कार्यात अनेकांचे नेहमीच सहकार्य मिळते. कोणत्याही पुरस्काराची,सन्मानाची अपेक्षा नसताना यापुर्वी अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. हिंदी शिक्षक मंडळाने त्यांना सन्मानित केल्याबद्दल त्यांनी मंडळाचे अध्यक्ष कैलास जाधव, सचिव सुमन दळवी, उपाध्यक्ष श्री. कांबळे, पंडित माने, सहसचिव सदाशिव सावंत व सर्व पदाधिकारी यांचे विशेष आभार मानले.

You cannot copy content of this page