वकील संग्राम देसाई, सुहास साटम यांनी पाहीले काम
ओरोस ता १९
अंमली पदार्थ असलेल्या गांजा याची वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतः जवळ बेकायदेशीर बाळगल्या प्रकरणी दोन संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी हा निकाल दिला आहे. आरोपींच्यावतीने संग्राम देसाई व सुहास साटम यांनी काम पाहिले.
२१ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ४.४७ ते ६.१५ वाजण्याचा सुमारास कुडाळ एम आय डी सी येथील आईस फॅक्टरी तिठा येथे सईद कादर शेख (वय ४८) रा. कुडाळ रेल्वे स्टेशन जवळ व खुदवुद्दीन महमदसाहब गडकरी (वय ४०) रा. कोल्हापूर चाळ मिरज, ता. मिरज, जिल्हा सांगली हे दोघे गांजा हा अमली पदार्थ वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बेकायदेशीररित्या बाळगलेले स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस नाईक अनुपकुमार खंडे यांना आढळून आले होते. हा गांजा मिरज येथून खरेदी करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस नाईक यांनी या दोघांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ६० हजार रुपये किमतीचा गांजा व रोख ८६७ रुपये तसेच स्प्लेंडर दुचाकी जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. यात न्यायालयाने या दोन्ही संशयितांना निर्दोष मुक्त केले आहे.
