कुसबे बौद्धवाडीतील स्ट्रीट लाईटचे काम रेंगाळले

ग्रामस्थांचा आंदोलनाचा वीज वितरण कंपनीला इशारा

ओरोस ता १८
कुडाळ तालुक्यातील कुसबे बौद्धवाडी येथे स्ट्रीट लाईट सुरू करण्यासाठी जून २०२२ मध्ये विद्युत पोल उभारण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर विद्युत वाहिनी जोडण्याचे काम झालेले नाही. याबाबत वीज वितरण कंपनीच्या पणदूर येथील सेक्शन व सिंधुदुर्गनगरी येथील येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता वेगवेगळी कारणे दिली जातात. ठेकेदार यांना विचारले असता ते सुद्धा समर्पक उत्तर देत नाही. त्यामुळे आमच्या नागरिकांवर हा अन्याय आहे. यासाठी प्रसंगी आंदोलन अथवा उपोषण करावे लागेल, असा इशारा येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सिंधुदुर्गनगरी येथील कार्यालयाला दिला आहे.
कुसबे बैशावाडीसाठी स्ट्रीट लाईट मंजूर आहे. आराखड्या नुसार जमिनीत पोल पुरण्याचे काम जून २०२२ मध्ये झाले आहे. केवळ जमिनीत पोल पुरण्यात आले आहेत. पुढील कोणतेही काम झालेले नाही. याबाबत वीज वितरण कंपनीच्या विविध कार्यालयाशी व ठेकेदार यांना विचारले असता चालढकल केली जात आहे. आमच्या बरोबर पोखरण सुतारवाडी येथे स्ट्रीट लाईट मंजूर झाली होती. मात्र पोखरण येथील काम पूर्ण करून गणेश चतुर्थी पूर्वी येथील जोडणी सुद्धा करण्यात आली आहे. परंतु आम्ही मागास असल्याने आमच्यावर अन्याय केला जात आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दोन – तीन महिने आधराविणा हे पोल उभे आहेत. सध्या जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. अधूनमधून वादळ सदृश्य स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीत हे पोल पडून नुकसान होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न करीत या अन्याय विरोधात वाचा फोडण्यासाठी आम्हाला आंदोलन किंवा उपोषण करावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर अशोक जाधव, महेंद्र जाधव, अजित जाधव, विलास कदम, चिंतामणी जाधव, माधुरी जाधव, अश्विनी जाधव, विशाखा जाधव, द्रौपदी जाधव, चैत्राली जाधव, सीमा जाधव, विनिता कदम यांच्या स्वाक्षरी आहेत.

चौकट
याबाबत बोलताना ग्रामस्थ अशोक जाधव यांनी सिंधुदुर्गनगरी येथील वीज वितरण कार्यालयाशी संपर्क केला असता लवकरच उर्वरित काम पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या दिरंगाई बाबत ग्रामस्थांत तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page