भरत गावडे यांचे प्रतिपादन
⚡सावंतवाडी ता.१५- : कोकणच्या विकासासाठी प्रगतीसाठी बॅ. नाथ पै यांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे आजच्या तरुण पिढीने समजावून घेणे महत्त्वाचे आहे. याकरीता बॅ. नाथ पै यांचे जीवनचरित्र वाचणे व त्यांचे जीवनपैलू आकलन करून घेणे ही काळाची गरज आहे, असे उद्गार भरत गावडे यांनी काढले.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सिंधुदुर्ग व समर्थ साटम महाराज वाचनालय, दाणोली यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यालय देवसू ता. सावंतवाडी या शाळेत ‘चला समजावून घेऊया बॅ. नाथ पै यांचे जीवनचरित्र’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
बॅ. नाथ पै यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्याना बॅ. नाथ पै यांच्या जीवनाचा परिचय व्हावा, या हेतूने व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मुख्याध्यापक विश्वनाथ राऊळ यांनी स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. बॅ. नाथ पै. विद्यालय, कुडाल या संस्थेच्या वतीने बॅ. नाथ पै यांची प्रतिमा शाळेला भेट म्हणून देण्यात आली. या कार्याला ग्रंथपाल दिया सुकी, सूर्यकांत डांगी, डी. डी. मोरे आदी उपस्थित होते. व्याख्यान संपल्यावर विचारलेल्या पाच प्रश्नांची अचूक उत्तरे पाच मुलांनी दिली.
