पणदूर-सावंतवाडा भागात ढगफुटीसदृश्य पाऊस
⚡कुडाळ ता.१५- : तालुक्यातील पणदूर-सावंतवाडा भागात काल रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे २० मीटर संरक्षक भिंत कोसळून अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत जनार्दन सावंत, गणपत राणे, गोपाळ सावंत यांच्या तीन दुचाकीचे (Mh07af 2953, Mh07 af 4117, Mh07an 1366) नुकसान झाले. संरक्षक भिंत कोसळण्याची ही घटना आज पहाटे ५.३० सुमारास घडली. दैवबलवत्तर म्हणून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत आज सकाळी सरपंच दादा साईल, उपसरपंच बबन पणदूरकर, पोलीस पाटील देऊ सवलत, ग्रामपंचायत सदस्य आबा सावंत, माजी सरपंच श्यामसुंदर सावंत, रत्नदीप सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच गावच्या तलाठी श्वेता दळवी यांना याबाबतची माहिती देण्यात आली.
कुडाळ तालुक्यात मागील चार दिवस मुसळधार पाऊस होत असून काल रात्री पणदूर भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. गावात काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला आलेली मोठी झाडे सुद्धा कोसळली असून सरपंच दादा साईल यांनी ही झाडे कटिंग करून येथील मार्ग सुरळीत केला.
