वेदांत प्रकल्प गुजरातला नेल्याप्रकरणी युवासेनेच्या माध्यमातून सावंतवाडीत निषेध आंदोलन….

असा प्रकार पुन्हा घडल्यास आ. केसरकर यांना विचारणार जाब; रुपेश राऊळ यांचा इशारा…

सावंतवाडी ता.१५-:

वेदांत कंपनीचा प्रकल्प गुजरात मध्ये पळविण्यास कारणीभूत ठरलेल्या शिंदे – फडणवीस सरकारचा आज सावंतवाडी येथे युवासेनेच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. यावेळी युवासेनेचे निषेध स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वेदांत कंपनीचा महाराष्ट्रात 1.45 लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. त्यामुळे महाराष्ट्रातील 1 लाख तरुणांना रोजगार प्राप्त होणार होता. परंतु, शिंदे – फडणवीस सरकारच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकल्प गुजरात मध्ये हलविण्यात आला आहे. त्यामुळे येथील युवकांना मिळणारा रोजगार हिरवण्यात आला आहे. त्याचा निषेध आज युवासेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. यावेळी शिंदे – फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळीतालुका प्रमुख रुपेश राऊळ बोलताना म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी येथील युवकांना रोजगार देण्याचे काम केले होते. परंतु, वेदांत प्रकल्प गुजरात मध्ये पळवून लावत शिंदे – फडणवीस सरकारने बाळासाहेबांचे विचार मलीन केले आहेत. महाराष्ट्रातील रोजगार अन्य राज्यात हलवून येथील युवकांना बेरोजगारी देणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी आगामी काळात तालुक्यातील बेरोजगार युवकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे. तसेच महाराष्ट्र यापुढे देखील असेच प्रकार झाल्यास स्थानिक आमदार आणि सद्याच्या सरकारचे मंत्री म्हणून आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून याबाबत त्यांना जाब विचारला जाईल असा इशारा श्री. राऊळ यांनी दिला आहे.

यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, युवासेना समन्वयक गुणाजी गावडे, शब्बीर मणियार, आबा सावंत, चंद्रकांत कासार, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page