⚡कणकवली ता.१३-: कळसुली शिक्षण संघ मुंबईच्या कळसुली इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स या प्रशालेत कळसुली शिक्षण संघ मुंबईचा ९३ वा स्थापनादिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी दुग्ध शर्करा योग म्हणजे १९८० च्या इयत्ता दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सूर्यकांत दळवी (उपकार्याध्यक्ष कळसुली शिक्षण संघ मुंबई ) यांनी भूषविले तर प्रमुख उपस्थितांमध्ये के.आर.दळवी (स्कूल कमिटी चेअरमन) नामदेव घाडीगावकर (व्हाईस चेअरमन स्कूल कमिटी) अतुल दळवी (स्कूल कमिटी सदस्य) ,रजनीकांत सावंत (स्कूल कमिटी सदस्य )१९८० च्या बॅचचे विद्यार्थी यामध्ये दाजी वारंग, श्रीकांत सावंत एस.पी.सावंत (माजी स्कूल कमिटी सदस्य) उत्तम वारंग इतर विद्यार्थी, प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. व्ही.वगरे, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर वृंद प्रशालेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये श्री.वगरे यांनी कळसुली पंचक्रोषीतील विद्यार्थ्यांना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने कळसुली शिक्षण संघाची स्थापना १९२९ मध्ये झाली.तसेच कळसुली शिक्षण संघाचा आजपर्यंतचा इतिहास त्यांनी विशद केला. के.आर. दळवी सरांनी कळसुली शिक्षण संघाचा कार्यकाल त्याचे कामकाज आणि संस्थापकांचे परिश्रम याची माहिती विद्यार्थी वर्गाला करून दिली. त्याचप्रमाणे १९८० च्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला.
दाजी वारंग आणि श्रीकांत सावंत,उत्तम वारंग यांनी १९८० च्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देऊन प्रशालेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व त्याच सोबत अभ्यास कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात सूर्यकांत दळवी यांनी संघाचे कामकाज आणि सुरुवातीच्या काळात संस्थापकांना सामोरे जावे लागलेल्या अडीअडचणींचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला. त्याचबरोबर नवीन इमारत बांधण्याचा मानस व्यक्त करून सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेला मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कळसुली शिक्षण संघाचे अध्यक्ष एस.व्ही.दळवी यांनीही याप्रसंगी संघाची वाटचाल आणि संघाला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी मार्गदर्शन पर संदेश पाठवला होता. यासोबतच कार्याध्यक्ष पुरुषोत्तम दळवी सरचिटणीस विजय सावंत, माजी अध्यक्ष नामदेव दळवी आदि मान्यवरांनी संघाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शुभेच्छा संदेश पाठवले.त्याचे वाचन यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.जी.सावंत तर शेवटी आभार ज्येष्ठशिक्षक एस.के. सावळ यांनी मानले.
