शिवसेना बांदा शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांची मागणी
बांदा /प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे बांदा शहर व परिसरातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भात तयार होण्याच्या कालावधीतच पावसाची रिपरिप सुरूच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. शेतकऱ्यांचे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी तलाठी व कृषी अधिकारी यांनी तात्काळ नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करावेत व भरपाई मिळवून देण्यासाठी प्रास्ताव तयार करावेत अशी मागणी शिवसेना बांदा शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी केली आहे.
श्री काणेकर यांनी सांगितले कि, गेले चार दिवस परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच हवामान खात्याने पुढील चार दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. भात तयार होणाच्या कालावधीतच पाऊस कोसळत असल्याने भातशेतीचे नुकसान झाले आहे. यासाठी शासनाने तात्काळ मदतीचा हात देण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करावेत व प्रधान्याने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
