व्यावसायिक सक्षम बनविण्यास होणार मदत;बाळू सावंत यांचे प्रतिपादन
बांदा/प्रतिनिधी
मराठा समाजातील मुलांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात मराठा समाजाच्या वतीने बिझनेस फोरमची निर्मिती करण्यात येणार असून याची माहिती गावागावात मेळावे घेऊन देणार असल्याचे प्रतिपादन बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी येथे दिली. पानवळ येथील गोगटे -वाळके महाविद्यालयात मराठा समाजातील मुलांसाठी दाखले देण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
त्यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना श्री सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डी. बी. वारंग, संचालक सुभाष मोर्ये, मराठा समाजाचे माजी अध्यक्ष तथा पत्रकार निलेश मोरजकर, खजिनदार राकेश परब, प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. किशोर म्हेत्री, प्रा. रमाकांत गावडे, महा ई सेवा केंद्राच्या संचालिका सौ. सुनीता आईर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री सावंत म्हणाले कि, मराठा समाजाची संख्या मोठी असल्याने नेहमीच समाजातील मुलांना आवश्यक शैक्षणिक दाखले मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे दाखले वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठीच महाविद्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अधिवास, डोमेसाईल, उत्पन्न दाखला यासंह इतर आवश्यक दाखले देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रमाकांत गावडे यांनी केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती सुनीता आईर यांनी दिली. या शिबिराचा लाभ अनेक विद्यार्थ्यांनी घेतला.
फोटो :-
पानवळ येथील गोगटे वाळके कॉलेजमध्ये आयोजित शिबिरात सुनीता आईर यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर. सोबत बाळू सावंत व इतर.
