रानभाज्यांचा आहारात समावेश करून जीवन सुखकर करा

गोगटे वाळके महाविद्यालय प्रभारी प्राचार्य डॉ एस पी वेल्हाळ यांचे आवाहन

⚡बांदा ता.०१-: कोकणला वनसंपदेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. या वारशाचे जतन होणे हे आधुनिक काळात अत्यंत गरजेचे आहे. मान्वी जीवनशैली बदलत आहे. यामध्ये आहाराबाबत मनुष्याने सजग राहणे आवश्यक आहे. निसर्गातील विविध रानभाज्या आपल्या आहारात आणून पौष्टीक व जीवनसत्व असलेल्या रानभाज्यांचा आस्वाद घेत आपले जीवन सुखकर करावे असे आवाहन गोगटे वाळके महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. वेल्हाळ यांनी येथे केले.
पानवळ येथील गोगटे वाळके महाविद्यालयात रानजाई निसर्ग मंडळाच्या वतीने रानभाज्या प्रदर्शन व त्याविषयीची शास्त्रीय माहिती याविषयी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. वेल्हाळ बोलत होते. कोकणच्या सह्याद्री पट्ट्यामध्ये अनेक वनौषधी वृक्षाबरोबरच नानाविध रानभाज्यांचा खजिना या परिसरात सापडतो. येथील वातावरणाला पोषक व विविध जीवनसत्वे असणाऱ्या रानभाज्यांचा दररोजच्या आहारात वापर करावा असे आवाहन विविध वक्त्यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील विविध भाज्यांची सुबक मांडणी केली होती. प्रत्येक भाजीची लिखित संकलित माहिती विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात भाज्यांची विक्री देखील करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. उमेश परब, प्रा. डॉ. अभिजित महाले यांनी केले. प्रास्ताविक प्रा. शरद शिरोडकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रमाकांत गावडे यांनी केले तर आभार प्रा. रश्मी काजरेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page