⚡कणकवली ता.३०-: कणकवली तालक्यातील कासार्डे – जांभूळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेच्यावतीने प्रिंटर, कपाटे, सिलिंग फॅन आदी शैक्षणिक साहित्याची देणगी देण्यात आली. या शैक्षणिक साहित्याच्या मदतीबद्दल शालेय शिक्षण समिती तसेच प्रशालेच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कासार्डे जांभूळवाडी शाळेत सोमवार २९ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमाला इंग्रजी साहित्य क्षेत्रातील उदयोन्मुख लेखिका मधुरा सावंत, ‘एआयबीए’चे कॉ. अजित सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चेतन शेट्ये, सदस्य मुस्कान खान, अतुल सावंत, नंदकिशोर सावंत, सचिन वंजारे तसेच मुख्याध्यापिका संध्या हजारे, सहाय्यक शिक्षिका सुकन्या मुंडले, रक्षिता वाडेकर, रेश्मा लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेला विविध शालेय उपक्रम लक्षात घेऊन लेझर प्रिंटर, गोदरेज कपाट, चार सिलिंग फॅन तसेच मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी गोष्टीची पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली. कार्यक्रमप्रसंगी मधुरा सावंत यांनी मुलांशी संवाद साधताना घर ते जग यातील अंतर कमी करण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना त्यांच्या संभाषण कौशल्यालाही दाद दिली. कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले.मुख्याध्यापिका सौ. संध्या हजारे यांनी आभार मानले.
