⚡मालवण ता.२५-: गांधील माश्यांच्या हल्ल्यात काल बुधवारी गंभीररीत्या जखमी झालेल्या
देवली काळेथर येथील राजन मोहन सारंग (वय ४५) या इसमाचा मालवण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना आज दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, मालवण तालुक्यातील देवली काळेथर येथे राहणारे राजन सारंग हे एकटेच राहत होते. अविवाहित असणारे राजन सारंग हे माडावर चढून व मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचे.
काल बुधवारी राजन सारंग हे घरापासून जवळच असणाऱ्या बाळकृष्ण अनंत वाक्कर यांच्या माडावर नारळ काढण्यासाठी चढले होते. यावेळी त्यांच्यावर गांधील माशांनी हल्ला चढवीत दंश करीत जखमी केले. गांधील माशांच्या हल्ल्यामुळे ते तातडीने माडावरून खाली उतरले. मात्र या हल्ल्यात त्यांची प्रकृती अत्यवस्थ बनल्याने स्थानिकांनी त्यांना मालवणातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र आज सकाळी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. याबाबत संतोष सोनू वाक्कर यांनी मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे.
