मुख्यालय पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात श्रावणी मतभावे यांचे प्रतिपादन
ओरोस ता.२४-:
आठ हजार वर्षापूर्वी निर्मिती झालेला तंबाखू सुरुवातीला देवपूजा व औषधासाठी वापरण्यात येत होता. मात्र, आता माणूस “किक” यावी म्हणून सेवक करीत आहे. यामुळे तंबाखू उत्पादक शक्तिमान बनत असून सेवक करणारे रोगी बनत आहेत. कॅन्सर सारखा माणसाला कुजवून व अक्षरशः सडवून मारणारा आजार तंबाखूजन्य पदार्थ सेवनाने ५० टक्के होत आहे. जगात तंबाखू उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. यावर निर्बंध आहेत मात्र त्याचे पालन केले जात नाही, अशी माहिती वसुंधरा संस्थेच्या प्रज्ञांगण तंबाखू प्रतिबंधक अभियानाच्या व्याख्यात्या सौ श्रावणी मतभावे यांनी मुख्यालय पत्रकार संघ आयोजित “वार्तालाप” कार्यक्रमात बोलताना दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचा वार्तालाप कार्यक्रम बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात संपन्न झाला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, तसेच संस्थेचे सतीश मतभावे उपस्थित होते. यावेळी पत्रकार संघ अध्यक्ष संजय वालावलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी नंदकुमार आयरे, विनोद दळवी, मनोज वारंग, दत्तप्रसाद वालावलकर, संदीप गावडे आदी उपस्थित होते. आजचा वार्तालाप व्यसनमुक्ती या विषयावर आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला प्रास्ताविक करताना सतीश मतभावे यांनी डॉ अनिल नेरूरकर यांच्यामुळे आम्ही हे सामाजिक कार्यक्रम राबवत आहोत. तंबाखू विरोधी मोहीम राबविण्यासाठी डॉ नेरूरकर यांनी प्रोत्साहन दिले आहे. या उपक्रमाची दखल घेत राज्य शासनाने श्रावणी मतभावे यांना महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार तर जिल्हा प्रशासनाने युवती पुरस्कार दिला आहे, असे सांगितले.
