साडेतीन तास केले ठिय्या आंदोलन;भरतीत जिल्ह्यातील उमेदवारांवर अन्याय झाल्याचे आले पुढे
ओरोस ता.२४-:
सिंधुदुर्ग शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील कंत्राटी शिपाई, परिचर, ड्रायव्हर, लिपीक, सफाई कामगार यावर काम करणारे कर्मचारी परजिल्ह्यातील भरण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक शासकीय सोपस्कार पूर्ण न करता गेले तीन महिने हे कर्मचारी कार्यरत आहेत. ही बाब बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साडेतीन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांनी दिलेल्या माहितीतून पुढे आली आहे. याबाबत मनसेने तीव्र नाराजी व्यक्त करीत हा जिल्ह्यातील तरुणांवर अन्याय आहे. याबाबत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना निवेदन देवून याची विशेष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे मनसे कुडाळ अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालया कडून चुकीच्या पद्धतीने वर्ग तीन व चार चे कर्मचारी भरती करिता निविदा काढण्यात आली आहे. त्या निविदेची प्रशासकीय पूर्तता न करता परजिल्हातील व्यक्तींना कंत्राटी कर्मचारी म्हणून वैद्यकिय महाविद्यालयात घुसवीले आहे. भविष्यात याच लोकांना अधिकृत भरतीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे, याची माहिती मिळाल्याने याबाबतचा आवाज बुधवारी मनसे पदाधिकार्यांनी उठविला. कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुनील गवस, बाबल गावडे, कुणाल किनळेकर, अमित इब्रामपुरकर, राजेश टंगसाळी, अविनाश अणावकर, दीपक गावडे, रामा सावंत, मोहन हेदुळकर, अमोल जंगले आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
