बंडू हर्णे यांनी वस्तुस्थिती समजून व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांच्या कायमस्वरूपी हितासाठी शासनस्तरावर ठोस प्रयत्न करावेत : सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्न व पाणी तपासणीच्या विषयावर माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केलेल्या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांनी प्रतिक्रिया देत, प्रसिद्धीसाठी आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा जिल्ह्यात शासकीय अन्न व पाणी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे.
जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्नपदार्थ तसेच पाणी तपासणीसाठी आवश्यक शासकीय प्रयोगशाळा उपलब्ध नसल्याने नमुने तपासणीसाठी बाहेरील मान्यताप्राप्त प्रयोगशाळांकडे पाठवावे लागतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक असून, यामुळे व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांना अनावश्यक वेळ आणि खर्चाचा सामना करावा लागत आहे.
सदर अन्न व पाणी तपासणी कार्यक्रमाचे आयोजन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आलेले नसून व्यापारी महासंघ आणि हॉटेल चालक-मालक संघटना यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन, तपासणी व्यवस्था किंवा शुल्क यांचा थेट संबंध अन्न व औषध प्रशासनाशी जोडणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि अन्न व्यवसाय करणारे उद्योजक कार्यरत आहेत. त्यांच्या हितासाठी जिल्ह्यातच शासकीय अन्न व पाणी तपासणी प्रयोगशाळा सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तपासणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि कमी खर्चाची होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून सिंधुदुर्गात शासकीय अन्न व पाणी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.
व्यापाऱ्यांच्या हितासाठी प्रश्न उपस्थित करण्याचे स्वागतच आहे. मात्र, संबंधित कार्यक्रमाचे आयोजन कोणी केले, तपासणीची व्यवस्था कोणी केली आणि अन्न व औषध प्रशासनाची नेमकी भूमिका काय होती, याची वस्तुस्थिती जाणून घेऊनच आरोप करावेत, असेही त्यांनी म्हटले. प्रश्न निर्माण करण्यापेक्षा त्याचे कायमस्वरूपी समाधान करण्यासाठी प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्गात अन्न व पाणी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे हीच व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांच्या हिताची खरी भूमिका ठरेल, असे सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांनी म्हटले.
