⚡वेंगुर्ला ता.२४-: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते टिकवण्याचे ख-या अर्थाने काम सैनिकांनी केले. अशा सैनिकांच्या मुलाखती घेवून त्यांचे अनुभव लिखित करून त्यांचे पुस्तक छापणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षक समित्यांनी पुढाकार घ्यावा सैनिकांच्या शौ-याची पुस्तके प्रत्येक शाळेत दिली पाहिजेत तसेच पाठ्यपुस्तकांमध्ये सैनिकांच्या शौ-र्याचे धडे आले पाहिजेत. जेणेकरून पुढील पिढी यातून प्रेरणा घेईल असे प्रतिपादन ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी वेंगुर्ला येथे करत वेंगुर्ला प्राथमिक शिक्षक समितीने सैनिकांचा सत्कार करून एक आदर्श समाजासमोर ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्ला तर्फे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुक्यातील आजी, माजी सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात वेंगुर्ला तालुक्यातील सुमारे ९० आजी, माजी सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, राज्य समितीचे सल्लागार भाई चव्हाण, शिक्षक पतपेढीचे चेअरमन आनंद पेडणेकर, पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास गावडे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर, समितीचे जिल्हा सरचिटणिस सचिन मदने, जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, शिक्षक पतपेढी अध्यक्ष तथा राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, राज्य महिला आघाडी सल्लागार सुरेखा कदम, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा निकिता ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, जिल्हा उपाध्यक्ष लवू चव्हाण, सावंतवाडी तालुकाध्यक्ष समिर जाधव, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सिताराम लांबर, सचिव प्रसाद जाधव, पतपेढी संचालक त्रिंबक आजगावकर, स्वामी सावंत, संतोष परब, महिला आघाडी तालुकाध्यक्षा लीना नाईक यांच्यासह सर्व वेंगुर्ला शिक्षक समिती तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला आघाडी पदाधिकारी व सदस्या आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला काही माजी सैनिकांनी आपले अनुभव कथन केले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात समूहगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या दाभोली शाळा नं. १ च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिताराम नाईक व नेहा गावडे यांनी केले
