मुंबई-गोवा महामार्गाची ना.रवींद्र चव्हाण २६ रोजी करणार पाहणी

⚡कणकवली ता.२२-: मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करा असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच २६ ऑगस्ट रोजी ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार असल्‍याची माहिती कुडाळ मालवणचे आम. वैभव नाईक यांनी दिली.

मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहामध्ये कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींची एक विशेष बैठक झाली. यात मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री ना.दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आम. नितेश राणे, आम. वैभव नाईक, आम. राजन साळवी, खास. सुनील तटकरे, आम. प्रवीण दरेकर, आम. शेखर निकम, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे, अधीक्षक अभियंता छाया नाईक, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, आर.टी. ओ. अधिकारी आदी उपस्थित होते. या बैठकीत आमदार वैभव नाईक यांनी गगनबावडा घाट रस्त्याच्या वारंवार निर्माण होणाऱ्या समस्येबाबत लक्ष वेधले. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या अपूर्ण कामांकडेही त्यांनी लक्ष वेधले. तर आम. नितेश राणे यांनी भुईबावडा, गगनबावडा घाट वारंवार कोसळत असल्याने बंद होणारे रस्ते यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याची मागणी केली. महामार्गाच्या प्रलंबित कामाबाबत लक्ष वेधत तसेच ज्या ठिकाणी महामार्गावर अपघात सदृश्य जागा आहेत त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी वाहनधारकांना सूचना मिळण्याकरिता ब्लींकर्स लावण्याची ही मागणी करण्यात आली. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणातील या सर्वच लोकप्रतिनिधींच्या सूचनाबाबत तत्काळ गांभीर्याने उपाययोजना करण्याची आदेश दिले आहेत. तसेच २६ ऑगस्टला ते महामार्गाची पाहणी करणार असल्‍याचे आम.वैभव नाईक यांनी सांगितले.

You cannot copy content of this page