शालेय मंत्री दीपक केसरकर यांचे मात्र मौन;रातोरात बदल्या होत असल्याने अधिकाऱ्यांचे होतेय खच्चीकरण
⚡सावंतवाडी ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस निरीक्षक पदाच्या नेमणूका सध्या रंगीत खुर्ची बनली आहे. पोलीस निरीक्षकांच्या या बदलल्यामुळे अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत असल्याची चर्चा आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, विद्यमान शालेय शिक्षण पर्यावरण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर मौन पाळले.
महाराष्ट्र राज्यातील राजकीय सत्तांतरामुळे सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस दलात देखील अधिकारी बदल्यांच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पोलीस निरीक्षकाच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करून रातोरात स्थगित केल्याची उदाहरणे आहेत.
कणकवली पोलीस निरीक्षक पदी काल शनिवारी नियुक्ती देण्यात आलेल्या फुलचंद मेंगडे यांची नियुक्ती तातडीने रद्द करीत त्यांना जिल्हा वाहतूक शाखा येथे नियुक्ती देण्यात आली आहे. तर जिल्हा वाहतूक शाखा येथे कार्यरत असलेले व या पूर्वी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब हल्ल्याचे तपासकाम केलेले सचिन हुंदळेकर यांना कणकवली पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर यापूर्वी कणकवली पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे राजेंद्र हुलावले यांची कुडाळ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती कायम ठेवण्यात आली.
कणकवली पोलीस ठाण्यात विशेषतः नेमणूक नको म्हणून पोलिस निरीक्षकांची मागणी असते त्यामुळे पोलिस दलात हलचल निर्माण झाली आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे नक्की कोणाच्या अंगुलीनिर्देशाने रातोरात निर्णय बदलत आहेत असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर दौऱ्यावर असताना सावंतवाडी येथे पत्रकारांनी या पार्श्वभूमीवर विचारले असता त्यांनी हसून मौन पाळले.
