शिवस्मारक उभे राहील, तेव्हाच विनायक मेंटेना खरी श्रद्धांजली

आमदार वैभव नाईक ;कणकवलीत मराठा समाजाकडून वाहण्यात आली श्रद्धांजली

⚡कणकवली ता.२१-: मराठा समाजाच्या आरक्षण, आर्थिक विकास या सगळ्या मागण्या पूर्ण होतील आणि शिवस्मारक उभे राहिले तेव्हाच विनायक मेंटेना खरी श्रद्धांजली मिळेल, असे भावपूर्ण उद्गार आमदार वैभव नाईक यांनी येथे व्यक्त केले.

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार तथा मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांचे १४ ऑगस्टला अपघाती निधन झाले. या निधनानंतर संपूर्ण जगभरातील मराठा समाजामध्ये हळूहळू व्यक्त करण्यात आली. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कणकवली मराठा समाजाच्या वतीने मराठा मंडळाच्या सभागृहात विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक ऍड. सुहास सावंत,जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँकेचे संचालक तथा नगरसेवक सुशांत नाईक, मराठा समाजाचे नेते लवू वारंग, डॉ. प्रवीण बिरमोळे, डॉ. तुळशीराम रावराणे, प्रा. सत्यवान राणे,सुशांत दळवी, सखाराम सकपाळ, मंगेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. शेती उत्पादनातून होणारे नुकसान यामुळे मराठा समाज भरडला जात आहे. या मराठा समाजाने उद्योजक बनावे, शैक्षणिकदृष्ट्या त्यांना आरक्षण मिळवून मराठा नवी पिढी पुढे यावी अशी भावना कै. विनायक मेटे यांची होती.
आमदार वैभव नाईक म्हणाले,मराठा समाजाची खरी ताकद ही एकत्र येण्यामध्ये आहे. मराठा क्रांती मूक मोर्चातून आपण ती दाखवून दिली. पण खऱ्या अर्थाने मराठा समाज अजूनही एकत्र आलेला दिसत नाही. मराठा समाज एकत्र यावा ही भावना आमदार मेटे यांची होती. सातत्याने ते विधान परिषदेत त्यावर भाष्य करत असत मलाही त्यांचा सहवास लागला.त्यांचे विचार बऱ्याच वेळा ऐकायला मिळाले मराठा समाजासाठी लढणारा हा नेता मराठा समाजात उद्योजक झाले पाहिजे अशी भावना घेऊन जगत होता. शिवस्मारक समितीच्या अध्यक्ष पदावरून त्यांनी बरेच काम केले. स्मारक ज्यावेळी खऱ्या अर्थाने अरबी समुद्रामध्ये उभे राहील,तेव्हा त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे.मराठ्यांनी मराठ्या समाजासाठी आणि मराठा उद्योजकांसाठी प्रयत्न करायला हवेत. ऍड. सुहास सावंत म्हणाले, मराठा समाजाच्या लढवय्या इतिहासाचा १४ ऑगस्ट हा दुर्दैवी दिवस होता,विनायक मेटे यांचा जीवन प्रवास थक्क करणार आहे. अण्णासाहेब पाटील यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये १९८१ सालामध्ये मोर्चा काढला होता. त्या मोर्चाचे खरे नेतृत्व तेव्हा मेंटेनी केले होते. त्या वेळेपासून मराठा समाजात संघटनेसाठी जोडलेला हा नेता आज आपल्यातून निघून गेला हे दुःख पचवणे तितकेसे सोपे नाही. समाजाला नेतृत्व देणे कोणतीही भावना आणि अपेक्षा न ठेवता समाजासाठी एकमेव उद्देश यांचा होता? मुंबईतील मराठा महासंघाच्या कार्यालयात कर्मचारी म्हणून काम करत मेंटेनी मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरण्याची काम केले. रस्त्यावर उतरणारा मराठा समाजाचा नेता आज हरपला आहे. त्याची पोकळी भरून काढण्यासाठी मराठा समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. मराठा समाजाच्या नव्या पिढीसमोर अनेक आव्हाने आहेत. आरक्षण असो, शिवस्मारक असो, उद्योजक, व्यावसायिक बनण्याचा संघर्ष असतो. हा संघर्ष मराठा समाजाच्या नव्या पिढीसमोर आहे. या संघर्षातून नव्या पिढीला बळ देण्यासाठी आपण एकत्र राहूया हीच खरी मेंटेना श्रद्धांजली ठरेल. जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले,मराठा समाजाचे नेतृत्व करणारा एक संघर्षवादी नेता हरपला. समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी जीवाचे रान करणारा हा नेता आणि त्याची राजकीय ताकद काय होती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. विधान परिषदेत पाच वेळा आमदार बनत असताना आपल्या मराठा भूमिकेची तडजोड त्यांनी केली नाही.पण राज्यातील सर्व पक्षांनी त्यांची ताकद ओळखून त्यांना विधान परिषदेवर कायम ठेवले. हीच खरी मराठा समाजाची ताकद होती.मराठा आरक्षणासाठी लढणारा हा नेता आज हरपला असला तरी मराठ्यांची ही ताकद कायमस्वरूपी राहिली पाहिजे. समाजासाठी सांगितलं तर नव्या पिढीला एक आदर्श निर्माण होईल आणि मराठा समाज असाच संघटित राहील.संघटित राहणे हीच खरी विनायक मेटे यांना श्रद्धांजली ठरणार आहे. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, डॉक्टर बिरमोळे, डॉक्टर रावराणे, श्री. सकपाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला विनायक मेटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्याम सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

You cannot copy content of this page