भावनिक सजगता- एक संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

⚡मालवण ता.१८-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचालित कौटुंबिक सल्ला केंद्र व टोपीवाला हायस्कूल, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भावनिक सजगता – एक संवाद ‘ हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमातील प्रमुख वक्त्या मानसोपचार समुपदेशक डॉ. सौ. पुजा मालपेकर यांनी उपस्थित नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘भावनिक सजगता’ या विषयावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले.

किशोरवयीन मुलांमध्ये ज्याप्रमाणे शारीरिक बदल होतात, त्याप्रमाणे मनाच्या पातळीवरीलही अनेक बदल होत असतात. मात्र ते बदल तेवढे लक्षात घेतले जात नाहीत असे डॉ. मालपेकर यांनी सांगत मुलांना पंचेंद्रिये यामध्ये डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मुलांमध्ये भावनेच्या भरात अनेक वाईट गोष्टी होताना दिसून येतात. त्यावेळी आपल्या भावनांवर नियंत्रण कशाप्रकारे ठेवावे, याविषयी त्यांनी माहिती देवून त्याच्याशी निगडीत श्वासाच्या व्यायामाविषयी मुलांकडून काही प्रात्यक्षिके करून घेवून श्वासाप्रती असलेली सजगता याबद्दल मुलांशी संवाद साधला. तसेच त्यांनी मुलांना राग, आनंद, दुःख, तिरस्कार या मनातल्या भावनांविषयी माहिती करून दिली. प्रत्येक विद्यार्थ्यांने मूल्यनिश्चिती करणे गरजेचे आहे. मी कोण आहे? याचाही विचार विध्यार्थ्यांने केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

सदर कार्यक्रम दोन सत्रामध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सल्ला केंद्राचे समुपदेशक मनोज गिरकर यांनी केले. या कार्यक्रमास टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. डी. एस. खानोलकर, पर्यवेक्षक श्री. प्रभू, सौ. ज्योती तोरस्कर, साटलकर व इतर शिक्षकवृंद, तसेच सेवांगणचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी समुपदेशक अदिती कुडाळकर, विजय कुडाळकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सौ. ज्योती तोरस्कर यांनी केले.

You cannot copy content of this page