Headlines

डोंगर सपाटीकरणामुळे कारिवडे-भेंवकवाडीतील घरांना धोका…

संबंधितांवर त्वरित कारवाई करा: माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी: तहसीलदारांना निवेदन केले सादर..

⚡सावंतवाडी, ता. ६-: कारिवडे-भेंवकवाडी परिसरातील डोंगर जमिनीचे सपाटीकरण करताना पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आल्याने परिसरातील घरे, शेती, विहिरी व कंपाऊंड भिंतींचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी तहसीलदार यांच्याकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.याबाबत माजी नगरसेवक सुरेश बाळकृष्ण भोगटे यांच्या माध्यमातून प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कारिवडे-भेंवकवाडी परिसरात सुमारे ३५ ते ४० कुटुंबे वास्तव्यास असून लगतच्या जागेवर मोठ्या प्रमाणात डोंगर जमीन सपाटीकरण करण्यात आले आहे. या कामामुळे पावसाचे पाणी व माती मोठ्या प्रमाणात परिसरातील घरांच्या दिशेने वाहून येत असून रहिवाशांच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे.
सपाटीकरणामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याने घरांमध्ये पाणी शिरणे, विहिरींमध्ये गाळ साचणे, कंपाऊंड भिंतींची पडझड तसेच शेतीचे नुकसान झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. भविष्यात मुसळधार पावसात मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
याप्रकरणी संबंधित जागेवरील उत्खनन व सपाटीकरणाची परवानगी, आवश्यक बांधकाम परवाने तसेच नियमांचे पालन झाले आहे का, याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी आणि पाण्याचा प्रवाह पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा व तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तहसीलदार, ग्रामपंचायत कारिवडे तसेच संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

You cannot copy content of this page