मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरातील भरड, बाजारपेठ परिसरात गेले काही दिवस सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच कमी दाबाने वीज पुरवठा होत असून यामुळे गृहिणींचे तसेच व्यापाऱ्यांचे हाल असल्याने संतप्त बनलेल्या महिलांनी व्यापाऱ्यांच्या सोबतीने आज वीज वितरण कार्यलयावर धडक देत वीज अधिकाऱ्यांना जाब विचारला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वीज समस्या तत्काळ दूर करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी महिलांनी केली. यावेळी महावितरणचे अधिकारी गणेश साखरे, श्री. भुजबळ यांनी आजच्याच दिवशी ही समस्या दूर करू, असे आश्वासन महिला व अन्य नागरिकांना दिले.
मालवण शहरातील भरडसह बाजारपेठेतील वीजपुरवठाच्या समस्या संदर्भात माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे यांच्या नेतृत्वाखाली नयना पोयेकर, सारिका कारेकर, सुषमा कारेकर, कृतिका तायशेटे, प्राची देऊलकर, सोनिया साळवी, ग्रेटा फर्नांडिस, लता लुडबे, सुनीता वेंगुर्लेकर, हेमलता चव्हाण, रूपाली आडवलकर, संगीता ओरसकर, किरण ओरसकर, स्नेहा ओरसकर, मृणाली रूमडे, सुनीता चव्हाण, दीपा वनकुद्रे, किरण देसाई मानसी कडू, उमा मेस्त्री, रसिका नेवाळकर, सारिका तळवडेकर, छाया वाळके, दिव्या कोचरेकर, दक्षता पारधीये, गौरवी पराडकर, बबिता बिळवसकर यांच्यासह नितीन वाळके, मंदार ओरसकर, रवी तळाशीलकर, किरण वाळके, अमेय देसाई, अजय पोयेकर, उमेश सांगोडकर, राजा शंकरदास, शैलेश पालव, किशोर बिळवसकर, गौरव वेर्लेकर, केदार देसाई, उत्तम पेडणेकर, संतोष माणगांवकर यांच्यासह अन्य नागरिकांनी देऊळवाडा येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला.
मालवण भरड नाक्यावरील विद्युत रोहित्रातून भरड बाजारपेठ परिसरात वीज पुरवठा सुरू होता. मात्र काही दिवसांपूर्वी येथील विद्युत रोहित्र अन्यत्र हलवण्यात आले असून एसटी स्टँड नजीकच्या रोहित्रातून वीज पुरवठा केला जात आहे. या ठिकाणाहून वीज पुरवठा सुरू झाल्यापासून सातत्याने कमी दाबाचा वीज पुरवठा होत असून सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने गृहिणींचे तसेच बाजारपेठेतील सर्व व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. गेल्या सोमवारी वीजपुरवठा सलग आठ तास खंडित होता. सायंकाळी तो पूर्ववत झाल्यानंतरही वीजपुरवठा खंडित झाला होता. सध्या सणासुदीचा काळ असून येत्या काही दिवसांनी गणेशोत्सव सुरू होणार आहे. या काळात भरड परिसरासह बाजारपेठेतील व्यावसायिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी अखंडित वीजपुरवठा होणे गरजेचे असून या दृष्टिकोनातून महावितरणने वीज पुरवठ्याच्या सुधारणा करणे आवश्यक आहे त्या तातडीने कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शहरातील भरड भागात ज्या अकरा केवीच्या वीज वाहिन्या ओढण्यात आल्या आहेत. त्या नारळाच्या झाडांना लागून सातत्याने शॉर्टसर्किट होत असून यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही समस्या दूर करावी अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली. बाजारपेठेतील अनेक भागांमध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यात कमी दाबाच्या तसेच अतिउच्च दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे गेल्या महिन्याभरात अनेकांचे इन्व्हर्टर, पंखे दूरदर्शन संच जळाल्याच्या घटना घडल्या आहेत.
विद्युत खांबाच्या ठिकाणी किटकॅट बॉक्स बसवण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. त्यानुसार दिवाळीपूर्वी किटकॅट बॉक्स बसवण्याची कार्यवाही केली जाईल असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी विद्युत खांबावरील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक असलेली शिडी उपलब्ध करून देऊ, असे व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले.
