Headlines

रुग्णसेवेसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला रोटरी क्लब सावंतवाडीकडून व्हीलचेअर भेट…

⚡सावंतवाडी ता. २६-:
गोरगरीब व गरजू रुग्णांना तत्काळ मदत उपलब्ध करून देणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची दखल घेत रोटरी क्लब सावंतवाडीच्यावतीने रुग्णसेवेसाठी नवीन व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्णांना २४ तास तत्काळ सेवा दिली जाते. तसेच गरजू रुग्णांना आवश्यक असलेल्या रुग्णोपयोगी वस्तू ‘वापरा आणि परत करा’ या तत्त्वावर उपलब्ध करून दिल्या जातात. संस्थेच्या या कार्याची दखल घेत शहरातील अनेक दानशूर व्यक्ती व संस्था आपल्याकडील रुग्णोपयोगी वस्तू मदत म्हणून प्रतिष्ठानला देत असतात.
रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष तथा नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याची दखल घेत ही व्हीलचेअर संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांच्याकडे सुपूर्द केली. ही व्हीलचेअर गरजू व गोरगरीब रुग्णांना आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिली जाणार आहे.
यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने रोटरी क्लब सावंतवाडीचे आभार मानण्यात आले. तसेच जिल्ह्यातील अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांना घरी उपचार घेताना उपयोगी पडण्यासाठी संस्थेला ‘फॉलर बेड’ उपलब्ध करून देण्यासाठी दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.
तसेच नागरिकांकडे असलेल्या जुन्या किंवा नवीन रुग्णोपयोगी वस्तू सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला दान केल्यास त्याचा फायदा जिल्ह्यातील हजारो गरजू रुग्णांना होईल, असेही सांगण्यात आले.
रोटरी क्लब सावंतवाडीच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात नेहमीच विविध सेवाभावी उपक्रम राबविले जात असून, या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, सचिव सिताराम तेली, अनंत उजगावकर, आनंद रासम, प्रवीण परब, दयानंद गवस, कवी सुधीर धुमे, जितू पंडित, अभय पै, कवी दीपक पटेकर तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम उपस्थित होते.

You cannot copy content of this page