Headlines

कुडाळ हायस्कूलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन’ उत्साहात साजरा…


​कुडाळ : तरुणांचे भविष्य, कुटुंब आणि समाज उद्ध्वस्त करणाऱ्या अंमली पदार्थांचे सेवन आणि त्यांची अवैध तस्करी याविरुद्ध समाजात जागरूकता निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर आज, २६ जून रोजी कुडाळ येथील दिवाणी न्यायालय, तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघटना कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे ‘आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचा गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करी विरोधी दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
​दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जी. ए. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री. नारायण साळवी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
​कार्यक्रमात बोलताना कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “अंमली पदार्थामुळे तरुणांचे भविष्य आणि कुटुंब उद्ध्वस्त होते. यामुळे समाजात गुन्हेगारी, दहशतवाद आणि भ्रष्टाचार वाढतो.” कुटुंबात व मित्रांमध्ये व्यसनाच्या दुष्परिणामांबद्दल चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, कोणाला व्यसन असल्यास समुपदेशक किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि अंमली पदार्थांच्या विक्रीची माहिती तत्परतेने पोलिसांना द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
​कुडाळ बार संघटनेचे वकील संजय रानडे यांनी ‘लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२’ (पॉक्सो कायदा) याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. १८ वर्षांखालील मुला-मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार, छळ आणि अश्लील चित्रफिती रोखण्यासाठी केंद्र सरकारने बनवलेल्या या विशेष कायद्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांनी ‘चांगला स्पर्श’ (Good Touch) आणि ‘वाईट स्पर्श’ (Bad Touch) यातील फरक समजून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
​वकील श्रीमती कविता खोचरे (उर्फ बोभाटे) यांनी महिला सुरक्षा आणि गोपनीयतेच्या अधिकारावर मार्गदर्शन केले. “प्रत्येक स्त्रीला घरात, रस्त्यावर आणि कामाच्या ठिकाणी भीतीशिवाय जगण्याचा, वावरण्याचा आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार हा मूलभूत मानवी हक्क आहे,” असे सांगत त्यांनी महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
​कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपप्राचार्य नारायण साळवी यांनी, “आजच्या कार्यक्रमात मिळालेल्या कायदेशीर आणि सामाजिक मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात पुरेपूर वापर करावा,” असे आवाहन केले.
​या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय कुडाळचे वरिष्ठ लिपिक आर. टी. आरेकर व चपराशी श्री. कडव यांनी केले. या प्रसंगी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे यांच्यासह विद्यालयातील सुमारे ८५ ते ९० विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page