संजू परब: काही नगरसेवक हे जम्मू-काश्मीरला अभ्यास दौऱ्याला गेलेत फिरायला नाही, त्यामुळे उगाच टीका नको; तर विकास कामांमुळे लोकांना त्रास झाला तर मी दिलगिरी व्यक्त करतो..
सावंतवाडी ता. २६ : नागरिकांच्या समस्या आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता आपण अभ्यास दौऱ्यावर गेलो नसल्याचे शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी स्पष्ट केले. तसेच अभ्यास दौऱ्यावर गेलेले नगरसेवक फिरण्यासाठी गेले नसून शहराच्या विकासाच्या दृष्टीने माहिती घेण्यासाठी गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना परब म्हणाले, “शहरात नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. पावसाळ्यातही विविध समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मी शहरातच राहून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. जरी या ठिकाणी कोणी नसले तरी मी एकटा पुरेसा आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी आता शिंदे सेनेचा जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे माझी जबाबदारी केवळ सावंतवाडी शहरापुरती मर्यादित नसून संपूर्ण मतदारसंघाची आहे. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी मी स्वतः ठिकठिकाणी पाहणी करत आहे.”
अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या नगरसेवकांवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना परब म्हणाले, “जे नगरसेवक गेले आहेत ते फिरायला गेलेले नाहीत, तर विकासकामांचा अभ्यास करण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण टीका करू नये.”
रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत ते म्हणाले, “काही ठिकाणी रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांना अडचणी येत आहेत. मात्र भविष्यात याचा फायदा नागरिकांनाच होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी थोडे सहकार्य करावे.”
“लोकांच्या हिताच्या विरोधात काही होत असेल तर मी नक्कीच आवाज उठवतो. मात्र चांगल्या कामासाठी थोडा त्रास सहन करावा लागला तरी त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे. तरीही कोणाला त्रास झाला असेल तर महायुतीच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो,” असेही संजू परब यांनी यावेळी सांगितले.
