वैभव नाईक:ठाकरेसेनेची कुडाळात महावितरणला धडक :अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांना विचारला जाब..
⚡कुडाळ ता.२५-: येथील महावितरण कार्यालयावर माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने आज धडक देत स्मार्ट वीज मीटर, वाढीव वीज बिले आणि धोकादायक भूमिगत वीज वाहिन्यांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्याशी झालेल्या चर्चेत स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान यापुढे कोणतीही जबरदस्ती होणार नसल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे वैभव नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
स्मार्ट मीटरच्या सक्तीच्या मुद्द्यावर वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत, लोकांच्या संमतीशिवाय मीटर बसविणे अयोग्य असल्याचे सांगितले. अदानी कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट मीटर बसविले जात असल्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम आणि नाराजी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी हे मीटर अदानी कंपनीचे नसून विविध चार कंपन्यांचे असल्याचे स्पष्ट केले. मात्र मीटर जोडणीचे काम अदानी कंपनीमार्फत केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वैभव नाईक यांनी ग्राहकांना उपलब्ध असलेल्या मीटर पर्यायांची माहिती द्यावी, कोणत्याही प्रकारे सक्ती करू नये तसेच स्मार्ट मीटर बसविण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांवर दबाव आणू नये, अशी मागणी केली. यावर यापुढे कोणतीही जबरदस्ती होणार नसल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे नाईक यांनी सांगितले.
याशिवाय जिल्ह्यात सुरू असलेल्या भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामांबाबतही लक्ष वेधण्यात आले. अनेक ठिकाणी वाहिन्या रस्त्यालगत धोकादायक अवस्थेत असल्याचा आरोप करत निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे भविष्यात मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात, असे वैभव नाईक यांनी सांगितले. या कामांवर महावितरणने देखरेख ठेवावी आणि त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. पावसाळ्यात अखंडित वीजपुरवठा ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच नागरिकांना चांगली सेवा द्यावी, अशी मागणीही ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने यावेळी केली.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वैभव नाईक म्हणाले, स्मार्ट मीटरबाबत सरकारची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे सक्ती नसल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे अधिकाऱ्यांवर टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव आणला जातो. यापुढे ग्राहकांवर स्मार्ट मीटरची जबरदस्ती झाल्यास गाठ शिवसेनेशी आहे, हे जबरदस्ती करणाऱ्या लोकांसह महावितरणने लक्षात घ्यावे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, तालुकासंघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख तथा पं.स.सदस्य योगेश धुरी, नेरूर विभाग प्रमुख शेखर गावडे, बाळा पावसकर, सुशिल चिंदरकर, अमित राणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
