आश्वासनांती आंदोलन मागे मात्र पुन्हा ठिय्या छेडण्याचा इशारा
⚡कणकवली ता.१४-: -कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही, “कातकरी, आदिवासी एकजुटीचा विजय असो’, ‘कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ यासारख्या घोषणांनी कातकरी बांधवांनी परिसर निनादून सोडला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वदिवशी कणकवली येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. सत्यशोधक संघटनेचे नेते ॲड.सुदीप कांबळे, प्रा. एम. पी. जाधव, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. स्वाती तेली यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले.
दरम्यान दुपारनंतर आंदोलनस्थळी दाखल होत तहसीलदार आर. जे. पवार ,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी कातकरी बांधवांसह कांबळे, जाधव, तेली यांच्याशी चर्चा केली व मागण्यांसंदर्भात आश्वासीत करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार कातकरी बांधवांनी आंदोलन स्थगित केले. मात्र, मागण्यांची पूर्तता न झाल्यास यापुढे बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही कातकरी बांधवांनी दिला.
मुलभूत मागण्यांसाठी आंदोलन
कातकरी बांधवांच्या वस्तीतील झोपडीवजा घरांना घरपत्रक उतारा देणे, त्यांना कायमस्वरुपी घरे उभारण्याच्या दृष्टीने फोंडाघाट येथे वनविभागाच्या जमिनीलगत कातकरी समाजाच्या जीवनमानाला अनुरूप शासकीय जागा देणे, समाजातील कुपोषीत बालकांना पोषण आहार, विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची कार्यवाही, कातकरी वस्त्यांमध्ये विजेची, पाण्याची सोय आदी समस्यांबाबत कातकरी बांधवांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वदिवशी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार रविवारी सकाळच्या सुमारास प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात झाली.
दुपारच्या सुमारास तहसीलदार आर. जे. पवार गटविकास अधिकारी अरूण चव्हाण आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी कातकरी बांधवांशी चर्चा केली. यावेळी कातकरी बांधवांनी आपल्या समस्यांचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचला. पाणी, वीज, उदरनिर्वाहासाठी जमिन अशा कित्येक मुलभूत सुविधांपासून वर्षानुवर्षे मागणी करुनही आम्ही वंचित असल्याचे बांधनी सांगितले. आश्वासनाअंती आंदोलन स्थगित
आश्वासन अधिकारी वर्गातर्फे देण्यात आले. त्यानंतर कातकरी बांधवांनी प्रांताधिकारी यांच्या अनुपस्थितीत तहसीलदार पवार यांच्याकडे निवेदन सुपूर्द करून आंदोलन स्थगित केले. अधिकाऱ्यांचे आभारही मानले
आंदोलनप्रसंगी सुनील पवार, बारक्या पवार, सखू पवार, बंटी पवार, रवी पवार, दत्ताराम निकम, राधिका पवार, बायो निकम, राजश्री निकम, बाबू निकम, मंजुळा पवार, मधू पवार, रमेश निकम, अनिल निकम, राजन पवार, पप्या पवार, राम निकम, दीपक पवार आदी कातकरी बांधव उपस्थित होते.
