रानभाज्यांचे संगोपन आणि माहिती करून घेणे काळाची गरज:संदीप राणे

फोंडाघाटमध्ये रानभाज्या प्रदर्शन व सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन शिबीर

⚡कणकवली ता.१४-: फोंडाघाट गावापासून सुरू होणारा पश्चिम घाट, हा जैवविविधतांचा वारसा असलेले स्थळ म्हणून शासनाने जाहीर केला आहे. ह्या जंगलात मिळणाऱ्या रानभाज्या आपण दुर्लक्षित केल्या आहेत. लागवडीखाली केली जाणारी शेती आणि ती सोडून शिल्लक राहिल्या त्या जंगलात व आपल्या आजूबाजूला मिळतात त्या रानभाज्या.जेव्हा आपल्या हातातून काही निसटत जाते त्याचवेळी आपण काय गमावलं हे समजून पश्चातापाची करण्याची वेळ येते. अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपल्या सभोवताली मिळणाऱ्या रानभाज्याचे संगोपन आणि माहिती करून घेणे ही काळाची गरज आहे. असे मार्गदर्शनपर विचार संदीप राणे स्नेहसिंधू पदाधिकारी यांनी “रान भाजीचे आहारातील महत्त्व” या विषयावर बोलताना काढले
      महाराष्ट्र शासन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) कणकवली कृषी विभागातर्फे व ग्रामपंचायत फोंडाघाटचे सौजन्याने रानभाजी प्रदर्शन, सेंद्रिय शेती प्रशिक्षण शिवाजी महाराज सभागृह फोंडाघाट येथे संपन्न झाले. यावेळी शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष अण्णा तेंडुलकर,सरपंच संतोष आंग्रे, उपसरपंच सुदेश लाड ,तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे,कृषी विद्यावेत्ता व फोंडाघाट कृषी संशोधन केंद्रचे विजयकुमार शेट्ये,मंडल कृषी अधिकारी धीरज तोरणे,मंडळ कृषी अधिकारी शांतिनाथ पवार, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्माचे विनायक पाटील,कृषी पर्यवेक्षक तळेरेचे देवेंद्र कांबळे, कृषी पर्यवेक्षक शिरवल गायत्री तेली ,कृषी पर्यवेक्षक फोंडाघाट देवयानी मडव,कृषी पर्यवेक्षक कणकवली राजन सावंत,कृषी सहाय्यक मृणालिनी वर्णे ,कृषी सहाय्यक अक्षया परब, गायत्री तेली, विमा प्रतिनिधी कृषी सांगेलकर आर.ए., मंडल अधिकारी नीलिमा प्रभूदेसाई, तलाठी अरुणा जयानावर,फोंडाघाट सिनियर कॉलेज प्राचार्य फुलझेंडे,ग्रामविस्तार अधिकारी कोलते आदी मान्यवर  उपस्थित होते.
      यावेळी कार्यक्रमाची सुरुवात अण्णा तेंडुलकर यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून व रानभाज्या प्रदर्शन चे उदघाटन फीत कापून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले .प्रास्ताविक धीरज तोरणे यांनी केले.
     
     सेंद्रिय शेती या विषयावर कृषी विद्यावेत्ता,कृषी संशोधन केंद्र फोंडाघाट विजयकुमार शेटे यांनी ,सेंद्रिय खताचा वापर, शाश्वत शेतीसाठी त्याची उपयुक्तता, पर्यावरणाला लाभणारे संरक्षण,आरोग्यासाठी उपकारक, यासाठी पशुधनाचा स्वीकार अपरिहार्य ,किंबहुना त्या नाण्याच्या दोन बाजू असल्याची माहिती दिली.आणि गरजा नुरूप पिकांची निवड- हवामान आणि सेंद्रिय खताचा वापर अपरिहार्य असल्याचे मार्गदर्शन केले.
      रानभाजी प्रदर्शन आणि  सेंद्रिय शेती प्रशिक्षण शिबीर चांगल्या प्रकारे यशस्वी होण्यासाठी फोंडाघाट च्या कृषी सहाय्यक अक्षया परब आणि त्यांच्या टीमने गेले दोन तीन दिवस विशेष परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समता चौकेकर कांबळे यांनी केले. या रानभाजी प्रदर्शन आणि  मार्गदर्शनाचा पंचक्रोशीतील कृषिमित्र, ग्रामस्थ ,शेतकरी, बागायतदार, कॉलेजचे प्राचार्य, विद्यार्थी, मराठी कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्या, ग्रामपंचायत सदस्य-कर्मचारी यांनी लाभ घेतला.

You cannot copy content of this page