सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास गांवकर यांची उपायोजना करण्याची मागणी
मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरात सध्या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून यामुळे नागरिक त्रस्त बनले आहेत. यावर्षी शहरात नगरपालिकेकडून योग्य पद्धतीने न झालेली गटार खोदाई व साफ सफाई तसेच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असणारी डास प्रतिबंधक औषध फवारणी देखील यावर्षी न केल्याने डासांचा उच्छाद वाढला असून यामुळे मलेरिया व इतर आजार फोफावण्याची भीती मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास गावकर यांनी डासांच्या प्रादुर्भावावर चिंता व्यक्त करत नगरपालिकेने डास प्रतिबंधक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.
मालवण शहरात दरवर्षी पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. यासाठी नगरपालिके कडून डास प्रतिबंधक औषध फवारणी, धुराची फवारणी करण्यात येते. यावर्षीही पावसाळ्यात शहरात डासांची उत्पत्ती वाढून डासांच्या चाव्याने नागरिक हैराण झाले आहेत. यावर्षी शहरातील गटारे, नाले यांची सफाई योग्य पद्धतीने नगरपालिकेकडून करण्यात आली नाही. यामुळे अनेक गटार व नाल्यांमध्ये पाणी वाहून न जाता जैसे थे स्थितीत आहे. साचलेल्या पाण्यातच डास अंडी घालत असल्याने या गटारांमधील पाण्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे सकाळी, सायंकाळी व रात्रीच्या वेळेत डासांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे घरोघरी नागरिक हैराण झाले असून डासांना पळवून लावण्यासाठी डास प्रतिबंधक अगरबत्ती, लिक्विड यासह धुराचा वापर करत आहेत. यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंडही पडत आहे. डासांच्या चाव्यातून मलेरिया व इतर आजार निर्माण होत असल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
डासांच्या चाव्याने त्रस्त असलेल्या नागरिकांची झोप उडाली असताना नगरपालिका प्रशासन मात्र याप्रश्नी झोपी गेलेले आहे. नागरिक आपापल्या पद्धतीने डासांचा सामना करत असताना नगरपालिका प्रशासनाला मात्र डास प्रतिबंधक फवारणी व इतर उपाययोजनांचा विसर पडल्याचे दिसत आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी नगरपालिकेकडून पाणी साचलेल्या ठिकाणी व डासांची उत्पत्ती होण्याच्या ठिकाणी डास प्रतिबंधक औषध फवारणी व धूर फवारणी अद्यापही राबविण्यात आलेली नाही.
डासांच्या प्रादुर्भाव प्रश्नावर मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास गावकर यांनी नगरपालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेने कोणतीही उपाययोजना केलेली नसून नगरपालिका प्रशासनाला नागरिकांच्या आरोग्याची काळजी नाही का ? असा सवाल तुळशीदास गावकर यांनी उपस्थित केला आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी गावकर यांनी केली आहे.
