प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ
⚡कणकवली ता.१३-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कणकवली तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.भालचंद्र महाराज संस्थांच्या भक्तनिवासात प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते व तहसीलदार रमेश पवार यांच्या उपस्थितीत रोपट्याला पाणी घालून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ व्यापारी सुभाष काकडे,तालुका अध्यक्ष दीपक बेलवलकर,उपाध्यक्ष राजन पारकर,विलास कोरगावकर,अशोक करंबेळकर,अमोल कामत,राजा राजध्यक्ष, डॉ सुहास पावकर,सुजित जाधव,श्री.ताम्हणकर,महसूल विभागाचे रमेश कांबळे,मंगेश मसुरकर,परीक्षक कला शिक्षक प्रसाद राणे आदी उपस्थीत होते.
प्रांताधिकारी वैशाली राजमाने म्हणाल्या,आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.यानिमित्त ७५ वा वाढदिवस सण म्हणून साजरा होत आहे.जसे आपण घरात आपल्या कुटुंबाचे वाढदिवस साजरे करतो तसाच आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव विविध उपक्रमाव्दारे हा साजरा करत आहोत.या निमित्त विद्यार्थ्यांना आपल्या देशा प्रति असलेले प्रेम चित्रातून रंगाच्या माध्यमातून व्यक्त करण्याची हि संधी व्यापारी संघाच्या वतीने चित्रकलेच्या स्पर्धेतून देण्यात आली आहे.याबद्दल व्यापारी संघाचे कौतुक करत आभार व्यक्त करत स्पर्धेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती
व स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात आणि अज्ञात नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात
घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण होऊन देशभक्तीची जाज्वल्य भावना त्यांच्या
मनात तेवत रहावी या उद्देशाने व्यपारी संघ कणकवलीतर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्याचे व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवकर यांनी सांगितले. ही स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटांत घेण्यात आली. गट १ साठी शाळेच्या प्रांगणातील ध्वजारोहणाचा प्रसंग तर गट २ साठी स्वातंत्र्य लढयातील कोणताही एक प्रसंग हा विषय देण्यात आला होता.या स्पर्धेत २७५ विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रसाद राणे तर आभार अशोक करंबेळकर यांनी मानले.
